(संगमेश्वर / प्रतिनिधी)
बी. के. एल. वालावलकर रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाने (NICU) पुन्हा एकदा उल्लेखनीय वैद्यकीय कामगिरी करत अकाली जन्मलेल्या आणि जन्मानंतर गंभीर श्वसनाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या एका नवजात बालिकेवर यशस्वी उपचार करून तिला पूर्णपणे स्थिर व निरोगी अवस्थेत घरी पाठविले आहे.
सौ. अश्विनी मोहिते यांच्या पोटी गर्भावस्थेच्या ३६व्या आठवड्यात या बालिकेचा बी. के. एल. वालावलकर रुग्णालयात जन्म झाला. जन्मानंतर बालिकेने त्वरित रडण्यास सुरुवात केली नाही तसेच तिला गंभीर श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने तिला तातडीने नवजात शिशु अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
प्रारंभी बालिकेला श्वसनासाठी आवश्यक पुनर्जीवन उपचार (Resuscitation), व्हेंटिलेटरचे सहाय्य तसेच सर्फक्टंट थेरपी देण्यात आली. उपचारादरम्यान बालिकेमध्ये संसर्गाची लक्षणे आढळून आल्याने आवश्यक रक्त तपासण्या करण्यात आल्या. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रतिजैविके (Antibiotics) सुरू करण्यात आली.
याच काळात बालिकेला कावीळ आणि रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याचा त्रासही निर्माण झाला. त्यावर फोटोथेरपी, प्लेटलेट ट्रान्सफ्युजन तसेच इतर आवश्यक उपचार करण्यात आले. रक्तसंस्कृती (Blood Culture) तपासणीत संसर्गाचे निदान झाल्यानंतर त्यानुसार संवेदनशील औषधोपचार देण्यात आले आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
काही दिवसांच्या अतिदक्ष उपचारांनंतर बालिकेची प्रकृती सातत्याने सुधारत गेली. हळूहळू व्हेंटिलेटर आणि इतर श्वसन सहाय्य कमी करण्यात आले. त्यानंतर बालिकेला स्वतः श्वास घेणे शक्य झाले. पुढे तिने आईचे दूध तसेच चमच्याने दिले जाणारे दूधही व्यवस्थित स्वीकारण्यास सुरुवात केली. वजन, श्वसन आणि इतर सर्व जीवनावश्यक बाबी स्थिर झाल्यानंतर बालिकेला निरोगी अवस्थेत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
या बालिकेवरील उपचार डॉ. अनिल कुरणे, डॉ. पार्वती हलबे आणि डॉ. अजिंक्य काळे तसेच नवजात शिशु अतिदक्षता विभागातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.
या यशस्वी उपचारामुळे बी. के. एल. वालावलकर रुग्णालयातील अत्याधुनिक नवजात अतिदक्षता सुविधा, अनुभवी डॉक्टरांचे कौशल्य आणि वैद्यकीय पथकाच्या समन्वित प्रयत्नांची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. उपचार प्रक्रियेत सहभागी सर्व डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे रुग्णालय प्रशासनाने विशेष अभिनंदन केले आहे.
फोटो : यशस्वी उपचारानंतर नवजात बालिकेसह तिचे पालक आणि बी. के. एल. वालावलकर रुग्णालयातील वैद्यकीय पथक.

