(चिपळूण)
शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, नवोन्मेष आणि संशोधनाचा भक्कम पाया घालणाऱ्या आकार एज्युकेशनल ट्रस्टच्या चेअरमन तसेच ए.एच.ए. कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या प्राचार्या डॉ. रोहिणी दीपक ओतारी यांनी मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट (Ph.D.) पदवी प्राप्त केली आहे. या यशामुळे त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
डॉ. ओतारी यांचा संशोधन विषय “An Analysis of Perception and Awareness Towards Financial Planning and Wealth Management Among Employees” असा असून, या अभ्यासासाठी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ३० कंपन्यांमधील ४८५ कर्मचाऱ्यांवर सखोल संशोधन केले. सुमारे तीन वर्षे सात महिने चाललेल्या या अभ्यासातून कर्मचाऱ्यांची आर्थिक नियोजनाविषयीची जाणीव, त्यांची समज आणि प्रत्यक्ष व्यवहारातील वास्तव ठळकपणे समोर आले आहे.
या संशोधनाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून, डॉ. ओतारी यांनी आजपर्यंत १६ राष्ट्रीय व ९ आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर्स प्रकाशित केले आहेत. त्यांच्या अभ्यासामुळे आर्थिक साक्षरता, वित्तीय नियोजन आणि संपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात उपयुक्त मार्गदर्शन उपलब्ध झाले आहे.
शिक्षण व संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना गुरु द्रोणाचार्य पुरस्कार, आयकॉनिक रोल मॉडेल एज्युकेशन नॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड, भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांचा हा शैक्षणिक प्रवास केवळ वैयक्तिक यशापुरता मर्यादित न राहता समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल पिल्ले कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स, पनवेल येथील प्राचार्य डॉ. सी. ए. गजानन तसेच संशोधन मार्गदर्शक डॉ. प्रेम भगवान आचार्य यांनी त्यांचे अभिनंदन केले. डॉ. रोहिणी ओतारी यांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून आणि विविध माध्यमांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

