(चिपळूण / प्रतिनिधी)
तालुक्यातील धामणवणे परिसरातील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या खून प्रकरणातील पसार असलेल्या दुसऱ्या संशयिताला अखेर चिपळूण पोलिसांनी गजाआड केले आहे. रविशंकर कांबळे या आरोपीला कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील कुलगर्गी येथे अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
६ ऑगस्ट रोजी धामणवणे येथील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा घरातच खून करण्यात आल्याची घटना उघड झाली. या प्रकरणाने चिपळूण शहरासह जिल्हाभर खळबळ उडाली होती. घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू करत अनेकांचे जाबजबाब नोंदवले. या दरम्यान ट्रॅव्हल एजंट जयेश गोधळेकर याच्यावर संशयाची सुई थांबली आणि त्याला त्याच दिवशी ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत जयेशने या प्रकरणी आपल्या सोबत आणखी एक साथीदार असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी या दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू केला.
दुसरा संशयित रविशंकर कांबळे हा मूळचा सातारा जिल्ह्यातील असला, तरी तो दीर्घकाळापासून चिपळूण व आसपासच्या भागात वावरत होता. पोलिसांनी त्याचा फोन सीडीआर तपासला असता तो कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने चिपळूण पोलिसांनी पथक पाठवून रविशंकरला गुलबर्गा जिल्ह्यातील कुलगर्गी येथून अटक केली. गजाआड करण्यात आलेल्या रविशंकर कांबळेला चिपळूण न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी पुढील तपासासाठी कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
या प्रकरणी नेमके काय कारण होते, खुनामागील आर्थिक वा इतर कोणते हेतू होते, याबाबत आता दोन्ही आरोपींकडून पोलिस कसून चौकशी करणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होण्यासाठी नागरिकांचे लक्ष तपासाच्या पुढील टप्प्याकडे लागले आहे.

