(खेड)
लोटे एमआयडीसी परिसरातील एका कंपनीकडून विषारी रासायनिक राख मोकळ्या जागेत उघड्यावर टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यामुळे मोकाट जनावरे तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांनी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
संजय आखाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीतून निर्माण होणारी रासायनिक राख कंपनीलगतच्या मोकळ्या जागेत टाकण्यात आली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने ही राख पावसाच्या पाण्यात मिसळून परिसरात वाहत आहे. त्यामुळे या परिसरात मुक्तपणे फिरणाऱ्या गायी, गुरे व इतर प्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याच परिसरात जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाणीपुरवठ्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत हे दूषित पाणी पावसाच्या प्रवाहातून पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळल्यास स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर संजय आखाडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत, “संबंधित कंपनीला विषारी रासायनिक राख उघड्यावर टाकण्याची अधिकृत परवानगी आहे का? प्रशासन आणि कंपनीमध्ये काही साटेलोटे आहे का? या निष्काळजीपणामुळे जनावरे किंवा नागरिकांच्या जीविताला हानी पोहोचल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित कंपनीवर योग्य ती कारवाई करावी आणि विषारी राखेची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित कंपनी किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

