(चिपळूण/ रत्नागिरी प्रतिनिधी)
शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली असतानाही बाजारपेठेत त्याची अवैध विक्री सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. चिपळूण शहरातील गजबजलेल्या पानगल्ली परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) टाकलेल्या धाडीत प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पानगल्ली येथील स्वामी जनरल पान शॉप या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत सुमारे ७ हजार ५४६ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पानमसाल्याचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी प्रवीण सदानंद बांदेकर (५३, रा. कापसाळ, चिपळूण) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त भाग्यश्री अण्णासाहेब परदेशी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांदेकर याने शासनाने बंदी घातलेला गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार नियोजनबद्ध कारवाई करत दुकानावर धाड टाकण्यात आली. या धाडीत विमल पान मसाला, आरएमडी पान मसाला यांसह विविध प्रकारच्या सुगंधित पानमसाल्यांचे एकूण पाच बॉक्स जप्त करण्यात आले. जप्त मालाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
बंदी असूनही गुटखा बाजारात कसा?
या कारवाईनंतर बंदी असतानाही गुटखा आणि तत्सम पदार्थांची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. शासनाने कठोर बंदी लागू केल्यानंतरही प्रतिबंधित माल बाजारात पोहोचतो कसा, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित यंत्रणांनी पुरवठा साखळीचा मागोवा घेऊन मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, एफडीएच्या या धाडीनंतर बाजारपेठेत खुलेआम गुटखा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, अशा प्रकारच्या आणखी कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

