(संगमेश्वर / प्रतिनिधी)
“कला क्षेत्राची व्याप्ती खूप मोठी असून या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र कोणतीही वाट निवडली तरी यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम, सातत्य आणि स्वतःची स्वतंत्र शैली विकसित करण्याची तयारी आवश्यक आहे,” असे प्रतिपादन युवा चित्रकर्ती मनाली प्रदीप सैतवडेकर यांनी केले.
व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला विभागातर्फे आयोजित ‘कला प्रवासाच्या वाटा’ या विषयावरील मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मनाली सैतवडेकर यांनी कला क्षेत्रातील विविध संधी, करिअरच्या दिशा, सर्जनशीलतेचे महत्त्व आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या मेहनतीविषयी मार्गदर्शन केले. “कलेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढे यावे. सातत्यपूर्ण सराव आणि कल्पकतेच्या बळावर प्रत्येकाला यश मिळू शकते,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनी व्यापारी पैसा फंड संस्था नेहमीच कला शिक्षणाला प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले. संस्थेने उभारलेल्या स्वतंत्र चित्रदालन आणि कला विभागामुळे राज्याच्या विविध भागांतील कलारसिक येथे भेट देत असतात. “विद्यार्थ्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या बळावर यश संपादन करावे. आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी मनाली सैतवडेकर आज यशस्वी चित्रकर्ती म्हणून नावारूपाला आली आहे, याचा संस्था आणि शाळेला अभिमान आहे,” असे त्यांनी नमूद केले.
मनाली सैतवडेकर या पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थिनी आहेत. दहावीनंतर त्यांनी सांगली येथील कला विश्व महाविद्यालयातून रंग आणि रेखाकला विषयात डिप्लोमा पूर्ण केला. शिक्षणानंतर त्यांनी स्वतंत्रपणे चित्रकलेच्या क्षेत्रात कार्य सुरू केले. उपनिषदे आणि विविध विषयांचे सातत्याने वाचन करून त्यांनी स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली विकसित केली.
शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या कला प्रवासातील अनुभव मांडले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून झालेल्या या संवादात्मक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
“एक कलाकार संवेदनशील असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम चांगला माणूस बनणे गरजेचे आहे, त्यानंतर उत्तम कलाकार घडतो. उत्तमोत्तम कलाकृती साकारण्यासाठी वाचन, निरीक्षण आणि सातत्यपूर्ण मेहनत आवश्यक आहे,” असे मनाली सैतवडेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.

