( देवरुख / प्रतिनिधी )
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुखच्या उद्योजकता आणि रोजगार विभागामार्फत ‘विम्याची मूलतत्त्वे’ या विषयावर एक आठवड्याची कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेत पदवी अभ्यासक्रमातील एकूण ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, यापैकी १७ विद्यार्थी जीवन विमा महामंडळ प्रतिनिधी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आणि सर्वांनी यश संपादन केले, हा महाविद्यालयाचा अभिमानाचा क्षण ठरला.
या कार्यशाळेसाठी जीवन विमा महामंडळ, रत्नागिरी विभागीय कार्यालयातील विकास अधिकारी प्रसाद आपटे आणि आनंद कुलकर्णी यांना मुख्य साधन व्यक्ती म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विम्याचे महत्त्व, विमा व्यवसायातील विविध संधी, विमाप्रतिनिधी म्हणून करिअरमध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या संधी आणि जीवन विमा महामंडळ परिक्षेची तयारी या सर्व बाबींबाबत सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रात्यक्षिक सत्रे, संवादात्मक चर्चा आणि प्रश्नोत्तरांचा देखील भाग ठेवण्यात आला होता.
प्रा. डॉ. मंदार जाखी यांनी संपूर्ण कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रभावीपणे कार्यभार सांभाळला. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, शिरीष फाटक, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी रोजगाराभिमुख उपक्रमांचे आयोजन महाविद्यालयात करणे ही आजची गरज असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या १००% यशामुळे विमा क्षेत्रात करिअरची दिशा खुली झाली असून, रोजगार क्षमतेसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याबद्दल प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी समाधान व्यक्त केले. अशा रोजगाराभिमुख आणि कौशल्याधारित कार्यशाळा महाविद्यालयामध्ये नियमितपणे आयोजित केल्या जातात अशीही माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.
फोटो : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर, प्रा. डॉ. जाखी, प्रशिक्षक कुलकर्णी व आपटे.

