(रत्नागिरी / वार्ताहर)
अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे भाट्ये समुद्रकिनारी स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. या उपक्रमात एनएसएसच्या ४० स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेत समुद्रकिनारा स्वच्छ करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
एनएसएसचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अभिजित भिडे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. निलेश जोशी, मनस्वी रांजेकर आणि सारिका माळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला प्लास्टिक कचरा, बाटल्या, पिशव्या तसेच इतर टाकाऊ वस्तू गोळा करून संपूर्ण परिसर स्वच्छ केला.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय, पर्यावरण संरक्षणाची जाणीव आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ झाली. समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा संदेशही विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दिला.
या अभियानासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रेरणेने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत स्वच्छ आणि पर्यावरणपूरक परिसर घडविण्याचा संकल्प केला.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या या उपक्रमामुळे भाट्ये समुद्रकिनारा स्वच्छ होण्यास मदत झाली असून, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

