(रत्नागिरी / वार्ताहर)
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांना सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘सहकार गौरव पुरस्कार-२०२६’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
शनिवार, ४ जुलै २०२६ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट येथे होणाऱ्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ॲड. पटवर्धन यांचा सन्मान होणार आहे. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष तथा आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.
सहकार चळवळीच्या विकासासाठी दिलेले मोलाचे योगदान, प्रभावी नेतृत्व, समर्पित कार्य आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पुरस्कार निवड समितीने ॲड. दीपक पटवर्धन यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
सहकार क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन कार्याचा हा सन्मान मानला जात असून, त्यांच्या पुरस्कार निवडीमुळे सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यभरातील सहकारी संस्था, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून ॲड. दीपक पटवर्धन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

