(देवरुख / वार्ताहर)
देवरुख शहरातील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते व व्यावसायिक श्रीकांत उर्फ कांता शशिकांत भागवत यांचे शनिवारी 11 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 55 वर्षांचे होते.
कांता भागवत हे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच भाजपाचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते. तत्पूर्वी शालेय जीवनामध्ये भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चांगले काम केले होते. राजकारणामध्ये काम करत असताना देखील त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभारला होता..वाळू, फाडी, खडी यांचा ते व्यवसाय गरजूंना अल्प दरामध्ये देऊन करत होते. यासाठी त्यांचे 3 ट्रक व्यवसायामध्ये कार्यरत होते. हा संपूर्ण व्यवसाय सांभाळून समाजकारण व राजकारण ते उत्कृष्टरित्या करीत असत.
प्रत्येक गरजूला मदत करणं हा त्यांचा स्वभाव होता. यामुळेच कांता भागवत यांनी व्यवसायामध्ये आपले नाव लौकिक प्राप्त केले होते.
गेली 30 वर्षे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करत होते. शेवटपर्यंत त्यांनी पक्षाची कास धरली होती. पक्षात काम करत असताना सडेतोड बोलणे हा त्यांचा स्वभाव होता. ज्या गोष्टी पटत नाहीत याबाबत स्पष्टपणे आपले मत व्यक्त करत असत. वेळ पडल्यास पक्षातील वरिष्ठांशी देखील ते आपले मत स्पष्टपणे मांडत असत. 30 वर्षापूर्वी भाजपा पक्ष कोणत्याही सत्तेत नव्हता, तत्पूर्वी देखील भाजपा हा विरोधी पक्ष म्हणून कार्यरत होता.
यावेळी पक्ष व पक्षातील कार्यकर्ते जिवंत ठेवण्यासाठी व्यवसायातून मिळवलेला पैसा खर्च करून पक्ष उभारणी व बांधणी त्यांनी केली होती. यामुळेच भाजपा पक्षात त्यांना आदराचे होते. प्रत्येक निवडणुकी प्रसंगी भाजपा व भाजपा- शिवसेना युतीतील उमेदवार निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणारा हा निष्ठावंत कार्यकर्ता होता.
कांता भागवत यांची 15 दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली. डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अधिक उपचारासाठी कुटुंबीयांनी त्यांना सांगली येथील रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच यकृत निकामी झाल्यामुळे शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
शनिवारी सायंकाळी त्यांचा पार्थिव कांजीवरा येथील निवासस्थानी आणण्यात आला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यावसायिक, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नागरीक व हितचिंतक यांनी हजेरी लावली होती. निष्ठावंत कार्यकर्ता हरपल्याच्या भावना भाजपातून व्यक्त करण्यात आल्या. भागवत यांच्या पार्थिवावर चर्मालय स्मशानभूमीमध्ये रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

