(खेड / वार्ताहर)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आंबवली (ता. खेड) येथील विद्यार्थिनी कुमारी गौरी विनायक यादव हिने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. तिच्या या यशामुळे शाळा, पालक आणि संपूर्ण गावाचा गौरव वाढला असून सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.
गौरीच्या या यशामागे मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती रसिका रमेश रेवाळे (खांडेकर) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण खांडेकर यांनीही तिला सातत्याने प्रोत्साहन व मार्गदर्शन केले.
विद्यार्थिनीच्या या यशाबद्दल शाळेत विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी यादव, उपाध्यक्षा सिद्धी यादव, शिर्के गुरुजी तसेच वैभवी यादव यांच्या हस्ते गौरीचा पुष्पगुच्छ व अभिनंदनपत्र देऊन गौरव करण्यात आला.
गौरीच्या यशाबद्दल आंबवली ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी तिचे मनापासून अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्ता आणि जिद्दीच्या बळावर मोठे यश मिळवण्याची क्षमता असल्याचे गौरीने आपल्या यशातून सिद्ध केले असून, तिच्या कामगिरीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.

