(देवरूख / वार्ताहर)
पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आणि वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील समूह, देवरूख पोलीस ठाणे अंतर्गत विभाग यांच्या वतीने गुरुवारी पाटगाव येथील ऐतिहासिक सांब मंदिर परिसरात वृक्षदिंडी व वृक्षलागवड या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
सांब मंदिर परिसरातून काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. त्यानंतर विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाची सामूहिक प्रतिज्ञा करण्यात आली. या उपक्रमाला कृषी, वन व आरोग्य विभागाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, जनप्रतिनिधी, निसर्गप्रेमी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी कृषी विभागाचे अधिकारी श्री. कोळी यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “माझ्या ३३ वर्षांच्या सेवाकाळात पोलीस पाटील समूहाच्या पुढाकाराने अशा प्रकारचा पर्यावरणपूरक आणि समाजोपयोगी उपक्रम प्रथमच पाहत आहे.” त्यांनी वृक्षलागवडीची योग्य पद्धत तसेच लागवडीनंतर झाडांचे संवर्धन कसे करावे, याविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनीही वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगत अशा उपक्रमांमधून समाजात सकारात्मक परिवर्तन घडते, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी पाटगाव ग्रामपंचायत, सांब मंदिर देवस्थान समिती आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस पाटील समूहाचे अध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव प्रदीप जाधव, खजिनदार राजाराम खेडेकर, सल्लागार सतीश अणेराव, देवदास सावंत, विजय शेलार तसेच सर्व पोलीस पाटील आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रसंगी वन विभागाच्या कांबळे मॅडम, पोलीस निरीक्षक रणदिवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर मुरूडकर, सांब मंदिर समितीचे अध्यक्ष सुभाष नटे, समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, स्वामी सेवक शिंदे महाराज, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, जनसेवक, निसर्गप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार पोलीस पाटील समूहाचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी मानले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या अनोख्या उपक्रमाचे देवरूख परिसरात सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यात अशाच समाजोपयोगी उपक्रमांची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

