(खेड)
मुंबई–गोवा महामार्गावरील कळंबणी येथे आज सकाळी एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या फॉर्च्युनर कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल आणि घराला जोरदार धडक दिली. हा अपघात कळंबनी उपजिल्हा रुग्णालयासमोरच घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याहून मुंबईकडे जाणारी फॉर्च्युनर कार प्रचंड वेगात होती. कळंबनी परिसरात येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव कारने प्रथम महामार्गालगतचा बोर्ड उडवला आणि त्यानंतर थेट रस्त्यालगत असलेल्या घर व हॉटेलमध्ये घुसली.
या भीषण धडकेत हॉटेलमधील उसाचा रस काढण्याची मशीन, टेबल-खुर्च्या, इतर साहित्य तसेच संपूर्ण पत्र्याची शेड पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
कळंबणी उपजिल्हा रुग्णालयासमोरच हा अपघात घडल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सुदैवाने, अपघाताच्या वेळी हॉटेलमध्ये ग्राहक किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली; अन्यथा गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गावर वाढता वेग आणि निष्काळजी वाहनचालना यामुळे असे अपघात घडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

