(संगमेश्वर/ साखरपा)
मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच असून, शुक्रवारी सकाळी दख्खन ते कळकदारा दरम्यान पुन्हा एकदा मोठी दरड कोसळली. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने घाटातील एकेरी मार्ग तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.
सकाळी सुमारे नऊ ते साडेनऊच्या दरम्यान ही दरड कोसळली. दरडीचा मोठा भाग महामार्गालगत येऊन पडल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने चारपदरी महामार्गाच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या लोखंडी संरक्षक बॅरिअरमुळे दरडीचा मलबा थेट वाहतुकीच्या मार्गावर आला नाही. मात्र, काही मोठे दगड आणि खडकांचे तुकडे रस्त्यालगत आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने घाट परिसरात आणखी दरडी कोसळण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे दख्खन ते कळकदारा दरम्यानचा एकेरी मार्ग तात्पुरता बंद ठेवण्यात आला असून, वाहतूक नियंत्रित पद्धतीने सुरू आहे. संबंधित यंत्रणेकडून दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, आंबा घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, सुरक्षित अंतर राखावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घाटातील दरडींचा वाढता धोका लक्षात घेता या मार्गावरून प्रवास करताना विशेष सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

