( संगमेश्वर / प्रतिनिधी )
दिवाळी अंकांची परंपरा शंभर वर्षापेक्षा जास्त जुनी असून युद्ध असो की दुष्काळ असो किंवा अन्य कोणत्याही प्रकारची सामाजिक संकटे असो तरीदेखील एकदाही खंड न पडता दिवाळी अंकाचा हा मराठी उपक्रम चालू असून त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. अन्य कोणत्याही भाषेमध्ये दिवाळी अंक प्रकाशित होत नाहीत, हे एक विशेष आहे. दिवाळीच्या आधी साहित्य चपराक आणि लाडोबा हे दोन दिवाळी अंक प्रकाशित केल्याबद्दल आणि विविध देशात पोचविल्याबद्दल चपराचे संपादक घनश्याम पाटील यांचे कौतुक करतो, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केले.
पुणे येथील श्रमिक पत्रकार भवनाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा तोडमल, निवेदक सुधीर गाडगीळ, पत्रकार सु. ल. खुटवड, ‘कालनिर्णय’चे संचालक जयेंद्र साळगावकर, प्रकाशक घनश्याम पाटील, कथाकार चंद्रलेखा बेलसरे व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. वर्षा तोडमल म्हणाल्या, इयत्ता आठवीमध्ये असल्यापासून घनश्याम पाटील हे लिखाण करत असून गरवारे महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी असल्याने आम्हाला त्यांचा अभिमान आहे. आज दिवाळी अंकाच्या एक लाख दहा हजार प्रती छापून त्या विविध देशातील वाचकांपर्यंत पोहोचविल्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक केले पाहिजे. हे दोन्ही अंक वाचताना असे जाणवले
की संपादन ही निर्मिती आहे आणि ही निर्मिती दमछाक करणारी आहे. तरीही हा आनंदाचा उत्सव आहे. भावी पिढीसाठी काम करणारी मासिके खूप कमी निघत आहेत पण लाडोबा वाचून मुलांना आनंदच होत आहे. हा अंक मुलांपर्यंत पोच केला पाहिजे, कारण मुलांची मनाची पाटी जशी कोरी असते. त्याच्यावर जशी पेन्सिल फिरवाल त्याप्रमाणे मुलं ते घेणार असतात. आजची पिढी खूप हुशार असून पालक कुठे ना कुठे कमी पडत असतात. पालक होण्यासाठी कुठली परीक्षा नाहीये, कुठली मुलाखत द्यावी लागत नाहीये. येणाऱ्या पिढीसाठी आपण समृद्ध पालक आहोत की नाही याचा विचार केला पाहिजे. त्यादृष्टीने चांगलं साहित्य मुलांपर्यंत पोचवण्यासाठी पालकांप्रमाणे शिक्षकांनी पण प्रयत्न केले पाहिजे. कारण शिक्षक हा शैक्षणिक क्रांतीचा अग्रदूत असतो असे सांगून या दोन्ही अंकाच्या अनुक्रमणिका अतिशय समृद्ध असल्याचे डॉ. वर्षा तोडमल यांनी सांगितले.
यावेळी संपादक घनश्याम पाटील यांनी साहित्य चपराकची माहिती देताना सांगितले की दिवाळी अंकाची परंपरा मोठी आहे. अनेक चांगले दिवाळी अंक प्रकाशित होत आहेत आणि मराठीचे ते वैभव आहे. २००२ पासून आम्ही ‘चपराक’चा दिवाळी अंक जगभरातल्या वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. दिवाळी अंक आला की दिवाळी सुरू झाली असे अनेक जण सांगतात. यंदा चपराक आणि लाडोबा हे दिवाळी अंक घटस्थापनेला आल्याचा खूपच आनंद वाटतो. दिवाळी अंक भारताबरोबर अमेरिका, ऑस्ट्रेलियासह अनेक देशात पोहोचला असून बेंगलोर येथे चपराकच्या साडेसहा हजार प्रती पाठविल्या आहेत.
या अंकामध्ये आम्ही काही लेख अगदी वेगळे आणि आग्रहाने लिहून घेतलेले आहेत. त्यामुळे आम्हाला जगभरातून वाचकांचे फोन येत आहेत. प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांचा एक लेख
जगभरातून ६८ लाख लोकांनी वाचला आहे. संपूर्ण अंकाचा इंग्रजी अनुवाद केला आहे आणि त्यासाठी ज्योती घनश्याम पाटील यांनी खूपच मेहनत घेतली असल्याचे घनश्याम पाटील यांनी सांगितले. आम्ही वर्षाला १००-१२५ पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित करीत आहोत. दरवर्षी वाचकांना चपराकसारखा एक दर्जेदार दिवाळी अंक दिल्याने मराठी वाचक वाढले असून दिवाळीच्या फराळाबरोबर दिवाळी अंक वाचण्यात एक वेगळीच मजा येते असे संपादक घनश्याम पाटील यांनी सांगितले.
यावेळी सुधीर गाडगीळ, सु. ल. खुटवड यांनी चपराकच्या दिवाळी अंकाविषयी आपले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव गिर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शुभांगी गिरमे, ज्योती घनश्याम, प्रमोद येवले, अरुण कमळापूरकर, रवींद्र कामठे, दयानंद महापुरे, सचिन सुंबे आदींनी परिश्रम घेतले.

