(दापोली / रत्नागिरी)
दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील बिरवाडी परिसरात गुरुवारी रात्री मगर आढळल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, वन विभाग आणि WAR (Wild Animal Rescuer) संस्थेच्या सदस्यांनी तत्परता दाखवत अवघ्या काही वेळात बचाव मोहीम राबवून मगर सुरक्षितरीत्या पकडली. त्यानंतर वन विभागाच्या नियमानुसार तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.
गुरुवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास बिरवाडी परिसरात मगर फिरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर विश्वजीत गुरव यांनी तातडीने याची माहिती वन विभाग आणि ‘WAR’ संस्थेला दिली. माहिती मिळताच संस्थेचे सदस्य मनित बाईत, प्रतीक बाईत, प्रफुल मिसाळ आणि वैभव बाईत घटनास्थळी दाखल झाले. वनाधिकारी प्रभू साबणे आणि शुभांगी गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
बचाव मोहिमेदरम्यान स्थानिक नागरिक अभिनय केळसकर, अभी पालशेतकर, रुपेश पालशेतकर, निलेश पालशेतकर आणि विश्वजीत गुरव यांनीही महत्त्वाचे सहकार्य केले. सर्वांच्या समन्वयातून अत्यंत दक्षतेने आणि कोणतीही जीवितहानी न होता मगर सुरक्षितरीत्या पकडण्यात रेस्क्यू पथकाला यश आले. त्यानंतर वन विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मगर तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आली. या तत्पर कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
दरम्यान, वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात मगर किंवा इतर कोणताही वन्यप्राणी आढळल्यास घाबरून जाऊ नये किंवा त्याला इजा करण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी तातडीने वन विभाग अथवा प्रशिक्षित रेस्क्यू टीमशी संपर्क साधावा, जेणेकरून वन्यजीवांचे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचे संरक्षण करता येईल.

