(संगमेश्वर / एजाज पटेल)
ऐन शेती हंगामात संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी गावात शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर रोगाची गंभीर साथ पसरली आहे. या आजारामुळे अनेक जनावरे आजारी पडली असून, गावात पशुवैद्यकीय दवाखाना असतानाही तिथे डॉक्टर नसल्याने उपचार मिळू शकलेले नाहीत. त्यामुळे आजारी जनावरे तडफडून मृत्युमुखी पडत आहेत, तर शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
गोपाळवाडी परिसरातील अनेक शेतकऱ्यांची गुरे या साथीच्या विळख्यात सापडली आहेत. जनावरांवर तातडीने उपचार होणे अत्यावश्यक असताना, गावातील पशुधन दवाखान्यात ना डॉक्टर आहेत, ना परिचर. त्यामुळे शेतकऱ्यांची फरफट होत असून, जनावरांच्या हालाकीची स्थिती बघून ते हतबल झाले आहेत.
उपचाराअभावी अनिल गजबर या गरीब शेतकऱ्याचे दोन रेडके त्याच्याच डोळ्यांसमोर तडफडून दगावले. दुसऱ्या एका शेतकऱ्याची बकरीही उपचार न मिळाल्याने मृत्युमुखी पडली.
देवरुख आणि संगमेश्वरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या बुरंबी गावात काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत उभारण्यात आली. मात्र आज या इमारतीचा उपयोग काहीच उरलेला नाही. सदैव कुलूपबंद असलेला हा दवाखाना ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशा स्थितीत आहे.
या ठिकाणी ना कोणतीही अधिकृत माहिती दिली जाते, ना फलकावर डॉक्टरचा किंवा परिचराचा संपर्क क्रमांक असतो. परिणामी, शेतकऱ्यांना मदत मागण्याचा मार्गही उरत नाही. साथीचा फैलाव रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही, याकडेही संतप्त शेतकऱ्यांनी लक्ष वेधले आहे.

