(संगमेश्वर /प्रतिनिधी)
देवरूख नगरपंचायतीने केलेल्या कथित अवाजवी करवाढीविरोधात शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, या निर्णयाविरोधात आता ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. करवाढ मागे घ्यावी आणि प्रशासनाने नागरिकांना त्याचे स्पष्टीकरण द्यावे, या मागणीसाठी येत्या ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मोठ्या संख्येने नागरिक नगरपंचायत कार्यालयावर धडक देत प्रशासनाला थेट जाब विचारणार असल्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला.
यासंदर्भात नुकतीच आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. बैठकीत शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि नव्याने आकारण्यात आलेल्या ‘वृक्ष कर’ या विषयांवर तीव्र चर्चा झाली. कोणतीही पूर्वसूचना न देता करामध्ये चौपट वाढ का करण्यात आली, तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून ‘वृक्ष कर’ कोणत्या निकषावर आकारला जात आहे, असे प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या धोरणावर जोरदार टीका केली. बैठकीत बोलताना अनेकांनी देवरूख नगरपंचायतीच्या हद्दीत सुमारे ३० टक्के शहरी आणि ७० टक्के ग्रामीण भागाचा समावेश असताना ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली. विकासकामांच्या तुलनेत करवाढीवर भर देणे हा अन्यायकारक निर्णय असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. नागरिकांच्या भावना डावलून लोकशाही मार्गाने आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशाराही बैठकीत देण्यात आला.
बैठकीला माजी राज्यमंत्री रवींद्र माने आणि जिल्हा परिषद सदस्या नेहा माने यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. तसेच नगरसेवक बाळा कामेरकर आणि सुरेश बने यांनीही प्रशासनाच्या धोरणाचा निषेध करत नागरिकांच्या भूमिकेला समर्थन दिले. यावेळी निधा कापडी, ऋतुजा कदम, युयुत्सु आर्ते, बंड्या बोरुकर, छोट्या गावणकर, दिलीप बोथले, प्रसाद सावंत, निखिल कोळवणकर, मनोहर गुरव, डॉ. मंगेश कांगणे, निलेश भुवड यांच्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाने करवाढीबाबत समाधानकारक भूमिका स्पष्ट न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनासह कायदेशीर मार्गाचाही अवलंब करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. तसेच ६ जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन आंदोलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

