(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथे शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सकल हिंदूधर्म संमेलनाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. कोंडगाव येथील कबनुरकर हॉलमध्ये पार पडलेल्या या संमेलनाला पंचक्रोशीतील हिंदू बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या संमेलनासाठी प्रशांत कदम हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. आपल्या प्रभावी भाषणातून त्यांनी हिंदू संस्कृतीचे महत्त्व, परंपरा जपण्याची गरज तसेच समाजाने एकत्र येऊन सामाजिक जबाबदारी स्वीकारण्याची आवश्यकता यावर सखोल मार्गदर्शन केले. हिंदू धर्माची परंपरा, त्यातील संस्कार आणि समाजातील ऐक्य टिकवून ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
संमेलनात समाजप्रबोधन, सांस्कृतिक मूल्यांचे जतन आणि सामाजिक एकता यावर विशेष भर देण्यात आला. प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये नवचैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
या कार्यक्रमाला खडीओझरे, खडी कोळवण, निनावे, किरबेट, भोवडे, देवडे, भडकंबा, मुर्शी, तिवरेमेढे, कोंडगाव आणि साखरपा परिसरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साखरपा पंचक्रोशीतील हिंदू बांधवांच्या पुढाकारातून आयोजित हे संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

