(नवी दिल्ली)
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी न्यायव्यवस्थेतील माहितीचे एकत्रीकरण मजबूत करण्यासाठी आणि देशभरातील न्यायालयीन सेवांची सार्वजनिक उपलब्धता सुधारण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी डिजिटल उपक्रमाची सोमवारी घोषणा केली. या अंतर्गत ‘वन केस वन डेटा’ (एक खटला एक डेटा) हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर ‘सु सहाय’ हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट लाँच करण्यात आला आहे.
सोमवारी कामकाजाच्या सुरुवातीलाच सरन्यायाधीशांनी या उपक्रमाची घोषणा केली. आम्ही ‘वन केस वन डेटा’ उपक्रमाची सुरुवात करत आहोत. या उपक्रमांतर्गत सर्व उच्च न्यायालये, जिल्हा न्यायालये आणि तालुका न्यायालयांमधील विविध स्तरांवरील माहिती एकाच एकात्मिक प्रणालीमध्ये एकत्रित केली जाईल. या माध्यमातून एक कार्यक्षम खटला व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत, असे सरन्यायाधीश म्हणाले. या उपक्रमामुळे देशातील सर्व न्यायालयांमध्ये अधिक सर्वसमावेशक आणि परस्पर
जोडलेला डिजिटल डेटाबेस तयार होऊन केस व्यवस्थापन सुलभ होणार आहे. सरन्यायाधीशांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘सु सहाय’ नामक सहायक चॅटबॉटच्या उद्घाटनाचीही घोषणा केली. हा चॅटबॉट सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळाशी जोडण्यात आला असून, यामुळे खटले लढणाऱ्या पक्षकारांना न्याय मिळवणे आणि न्यायालयीन सेवांचा लाभ घेणे अधिक सुलभ होईल. हा चॅटबॉट ‘राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने’ सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीच्या सहकार्याने विकसित केला आहे. हा चॅटबॉट आमच्या वेबसाइटसाठी एक सहायक म्हणून काम करेल. हे नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आवश्यक सेवांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि मदत मिळवून देण्यासाठी एक सोपा आणि सोयीस्कर इंटरफेस प्रदान करेल, असे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले.
या डिजिटल उपक्रमांना पाठिंबा दिल्याबद्दल सरन्यायाधीशांनी रजिस्ट्री अधिकारी आणि बार सदस्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. हे उपक्रम सर्व भागधारकांसाठी फायदेशीर ठरतील, असा विश्वास सरन्यायाधीशांनी व्यक्त केला.

