(रायगड / महाड)
महाड तालुक्यातील धामणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली असून 24 वर्षीय विवाहित महिला आपल्या सात महिन्यांच्या बाळासह बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव प्रिया प्रशांत चिकणे (वय 24) असे असून, तिच्यासोबत तिचा सात महिन्यांचा मुलगा प्रिन्स प्रशांत चिकणे हाही बेपत्ता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता प्रिया हिने सासू शीतल चिकणे यांना “बिरवाडी येथे आईकडे जाते” असे सांगून घरातून बाहेर पडली. त्यावेळी तिने मुलाला सोबत घेतले होते. मात्र त्यानंतर ती घरी परतली नाही आणि तिच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरात शोध घेतला, परंतु दोघांचाही ठावठिकाणा लागला नाही. अखेर याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
महिलेच्या वर्णनानुसार, तिचा रंग सावळा असून उंची सुमारे 5 फूट आहे. तिने जांभळ्या रंगाचा टॉप, निळी जीन्स, गळ्यात मंगळसूत्र आणि काळ्या-चॉकलेटी रंगाच्या चप्पला परिधान केल्या होत्या. तिच्या डाव्या हातावर “प्रशांत” असे गोंदलेले आहे. तर सात महिन्यांचा प्रिन्स गुलाबी टी-शर्ट आणि काळी हाफ पॅन्ट घातलेला असून दोन्ही हातात काळ्या-पांढऱ्या रंगाचे पाटले आहेत.
महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या महिला किंवा बाळाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

