( नवी दिल्ली )
भारतीय रेल्वेच्या इतिहासात नवे पर्व सुरू करणारी देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजन ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पूर्णपणे ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेत विकसित करण्यात आलेल्या या अत्याधुनिक ट्रेनचे उद्घाटन 17 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हायड्रोजन इंधनावर धावणारी ही भारतातील पहिली रेल्वे सेवा असून, पर्यावरणपूरक, कमी प्रदूषण करणारी आणि शाश्वत सार्वजनिक वाहतुकीच्या दिशेने भारतीय रेल्वेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
जिंद-सोनीपत मार्गावर होणार पहिली धाव
हायड्रोजन ट्रेनच्या पायलट प्रकल्पासाठी हरियाणातील जिंद-सोनीपत हा 90 किलोमीटरचा मार्ग निवडण्यात आला आहे. या मार्गावर ट्रेनची चाचणी आणि प्रारंभीची सेवा सुरू केली जाणार आहे. तांत्रिक अनुभव आणि यशस्वी चाचण्यांनंतर ही सेवा देशातील इतर रेल्वे मार्गांवरही टप्प्याटप्प्याने विस्तारली जाणार आहे.
ही ट्रेन पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर विकसित करण्यात आली आहे. यामध्ये 1,200 किलोवॅट क्षमतेची हायड्रोजन फ्युएल-सेल प्रोपल्शन प्रणाली बसवण्यात आली असून, पारंपरिक डिझेल इंजिनाला पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध झाला आहे.
हायड्रोजन फ्युएल सेलमधून वीज निर्माण होऊन ट्रेन चालते. या प्रक्रियेत कार्बन उत्सर्जन अत्यल्प होते आणि मुख्य उपउत्पादन म्हणून पाण्याची वाफ निर्माण होते. त्यामुळे ही तंत्रज्ञान भविष्यातील हरित रेल्वे व्यवस्थेसाठी महत्त्वाची मानली जाते.
सुरुवातीला ताशी 75 किमी वेग
प्रारंभी ही ट्रेन ताशी 75 किलोमीटर वेगाने धावणार आहे. भविष्यात तांत्रिक अनुभव आणि सुरक्षिततेच्या आधारे तिच्या वेगात व सेवेत वाढ केली जाऊ शकते. रेल्वे प्रशासनाने या ट्रेनच्या संचालनासाठी पहिल्या तीन महिन्यांसाठी प्रशिक्षित तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवल्यास तत्काळ उपाययोजना करता याव्यात, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
प्रवाशांच्या सोयी आणि सुरक्षिततेचा विचार करून या ट्रेनमध्ये एकूण 10 प्रवासी डबे ठेवण्यात आले आहेत. एका फेरीत 682 प्रवासी प्रवास करू शकतील, अशी क्षमता या ट्रेनमध्ये आहे. प्राथमिक माहितीनुसार, जिंद-सोनीपत मार्गावरील या ट्रेनचे तिकीट दर साधारण 5 रुपयांपासून 25 रुपयांपर्यंत असू शकतात. मात्र, याबाबत भारतीय रेल्वेकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
जिंद ते सोनीपत हे सुमारे 90 किलोमीटरचे अंतर ही ट्रेन जवळपास दोन तासांत पूर्ण करेल. मार्गावर एकूण 12 स्थानकांवर थांबा असेल. रेल्वेच्या नियोजित वेळापत्रकानुसार, ट्रेन क्रमांक 74010 सकाळी 7.40 वाजता जिंद स्थानकावरून सुटून सकाळी 9.40 वाजता सोनीपत येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक 74009 सकाळी 10.40 वाजता सोनीपत येथून सुटेल आणि दुपारी 1.00 वाजता जिंद येथे पोहोचेल.
17 जुलैपासून या ट्रेनची विशेष सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र सर्वसामान्य प्रवाशांसाठी नियमित व्यावसायिक सेवा नेमकी कधी सुरू होणार, याबाबत उत्तर रेल्वेकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच यासंदर्भात सविस्तर वेळापत्रक आणि आरक्षणाची माहिती जाहीर केली जाण्याची अपेक्षा आहे.
भारतीय रेल्वेच्या हरित भविष्याची सुरुवात
हायड्रोजन ट्रेनमुळे भारतीय रेल्वेला डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होणार असून, कार्बन उत्सर्जनात घट, स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेला चालना मिळणार आहे. ‘नेट झिरो कार्बन एमिशन’च्या दिशेने भारतीय रेल्वेचे हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. यशस्वी अंमलबजावणीनंतर देशातील इतर अनेक मार्गांवरही हायड्रोजन ट्रेनची सेवा सुरू करण्याचा भारतीय रेल्वेचा मानस आहे.

