(नाशिक / वृत्तसंस्था)
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्याजवळ रविवारी (26 जुलै) सकाळी सुमारे 8.15 वाजता झालेल्या भीषण अपघातात नवविवाहित पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात पत्नीची बहीण गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 15 ईपी 3031 क्रमांकाची मॅक्झिमो प्रवासी वाहतूक करणारी गाडी खामखेडा येथून पिळकोसकडे जात होती. त्याचवेळी एमएच 39 पी 2449 क्रमांकाच्या दुचाकीवरून दिनेश करणसिंग गावित, पत्नी कीर्ती गावित आणि पत्नीची बहीण त्रिशा गावित हे कळवणहून सटाणामार्गे आपल्या मूळगावी प्रतापपूर (ता. नवापूर) येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात होते. पिळकोस फाट्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या भीषण अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दिनेश गावित आणि कीर्ती गावित या नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू झाला. तर त्रिशा गावित यांच्यावर अद्याप उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
कीर्ती गावित या डांग सेवा मंडळ संचलित जनता विद्यालय, अभोणा येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या, तर दिनेश गावित हे जलसंपदा विभागात कर्मचारी होते. मे महिन्यातच दोघांचा विवाह झाला होता. नव्या संसाराची स्वप्ने डोळ्यांत घेऊन आयुष्याची सुरुवात केलेल्या या दाम्पत्याचा अवघ्या दोन-अडीच महिन्यांतच अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

