(मुंबई)
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (२९ ऑगस्ट) मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला प्रारंभ केला. उपोषण सुरू करताना त्यांनी सरकारला कठोर इशारा दिला – “मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही. सरकारने गोळ्या घातल्या किंवा तुरुंगात टाकले तरी मी उपोषण सुरूच ठेवणार.”
सकाळी दहाच्या सुमारास जरांगे पाटील आझाद मैदानावर दाखल झाले. हजारोंच्या गर्दीतून त्यांच्या गाडीला वाट काढणे अवघड झाले होते. मंचावर पोहोचल्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आणि उपस्थितांना संबोधित केले.
“मुंबईत जाळपोळ, दगडफेक किंवा गोंधळ करायचा नाही. आपण इथे समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आलो आहोत. शांततेत रहा, कोणतेही नुकसान करू नका,” असे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले.
जरांगे पाटील म्हणाले की, “मुंबई आज मराठ्यांनी जाम करून दाखवली आहे. सरकारने आम्हाला परवानगी दिली, त्यामुळे आम्हीही पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य करणार आहोत. माझ्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय मी इथून उठणार नाही.”
त्यांनी आंदोलकांना शिस्तबद्ध राहण्याचे आवाहन करत सांगितले – “गाड्या पोलिस सांगतील तिथेच लावा. स्वतःहून स्वयंसेवक म्हणून काम करा. दोन तासांत मुंबई रिकामी झाली पाहिजे. दारू पिऊन धिंगाणा करू नका, समाजाची मान खाली जाईल असे वर्तन करू नका.”
कुटुंबाचा उल्लेख करताना त्यांनी भावनिक होत म्हटले, “मी माझे कुटुंब सोडून समाजासाठी लढतोय. माझ्या कुटुंबाची राखरांगोळी झाली तरी चालेल, पण समाज उभा राहिला पाहिजे. मैदान दिलंय तिथेच राहा, मी आझाद मैदानात आहे म्हटल्यावर तुम्ही घरात निर्धास्त झोपा.”
राजकीय वापर होऊ नये, यावर भर देत ते म्हणाले “कोण राजकीय पोळी भाजतेय याकडे लक्ष ठेवा. आंदोलनाला बट्टा लागू नये. मी मरण पत्करायला तयार आहे, मात्र मागे हटणार नाही. विजय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील.”

