(नाशिक)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) नाशिक विभागीय कार्यालयात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. कामकाजात गंभीर हलगर्जी आणि त्रुटी आढळल्याच्या आरोपावरून एकाचवेळी 11 अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईत दोन डेपो मॅनेजरसह क्लास-1 आणि क्लास-2 दर्जाचे वरिष्ठ अधिकारीही अडकले आहेत.
महामंडळाच्या मुख्यालयाकडून उत्पन्न वाढवणे आणि खर्च नियंत्रण यावर विशेष लक्ष देण्यासाठी एक उच्चस्तरीय नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली होती. 10 जून रोजी माहिती तंत्रज्ञान विभागाचे महाव्यवस्थापक आणि नियोजन अधिकारी यांच्या दोन सदस्यीय समितीने नाशिक विभागात अचानक तपासणी केली. या तपासणीदरम्यान विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या कामात गंभीर त्रुटी आणि व्यवस्थापनातील हलगर्जीपणा आढळून आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर समितीच्या अहवालाच्या आधारे तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये क्लास-1 दर्जाचे 3 अधिकारी आणि क्लास-2 दर्जाचे 8 अधिकारी अशा एकूण 11 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये दोन डेपो मॅनेजर (आगार व्यवस्थापक) देखील आहेत.
महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांना निलंबनाचे आदेश स्वीकारले नाहीत तर ते आदेश पोस्टाद्वारे पाठवले जाणार आहेत. एसटी महामंडळाच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण नाशिक विभागात खळबळ उडाली आहे. इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील टप्प्यात आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महामंडळाच्या प्रवासी भाड्यात वाढ झाल्यानंतरही अपेक्षित उत्पन्नात वाढ न झाल्याने प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याचे मानले जात आहे. कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

