( मुंबई )
गटारी अमावस्या अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, मद्यप्रेमींसाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून दारूवरील करात वाढ करण्यात आल्यानंतर, बार आणि हॉटेल चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संपाचा इशारा दिला आहे. इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने सरकारला थेट २ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जर सरकारने करवाढ तातडीने मागे घेतली नाही, तर राज्यभरातील परमिट रूम्स आणि बार बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
नेमकी काय आहे बारवाल्यांची मागणी?
सरकारच्या नवीन कर धोरणामुळे बार चालकांचा व्यवसाय अडचणीत येत असल्याचं असोसिएशनचं म्हणणं आहे. त्यांच्या मते:
-
दारूवरील व्हॅट (VAT) ५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे
-
परवाना शुल्कात १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे
-
उत्पादन शुल्कातही वाढ झाली आहे
या सगळ्या वाढीमुळे हॉटेल आणि बार व्यवसाय अडचणीत आल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. त्यांच्या मते, करवाढ अन्यायकारक असून, तातडीने निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गटारी अमावस्या म्हणजे अनेक मद्यप्रेमींना जल्लोषात साजरी करण्याचा दिवस. या दिवशी राज्यभरात परमिट रूम्स आणि बारमध्ये मोठी गर्दी दिसून येते. मात्र संपाच्या पार्श्वभूमीवर यंदा गटारीसाठी मद्यप्रेमींना बार उपलब्ध होणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. हॉटेल असोसिएशनचे म्हणणे आहे की, दारूवरील करवाढीचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर आणि व्यवसायाच्या उलाढालीवर होतो. वाढीव दरामुळे ग्राहक कमी होतील, परिणामी उद्योग संकटात सापडेल. त्यामुळे सरकारने व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून तातडीने कर धोरणाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जर बारवाल्यांनी दिलेला इशारा खरा ठरवून संप पुकारला, तर गटारीच्या दिवशी मद्यप्रेमींची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. सरकारने याबाबत लवकर निर्णय घेतला नाही, तर राज्यभरात बार, परमिट रूम्स आणि काही हॉटेल्स बंद ठेवली जाऊ शकतात, असा स्पष्ट इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.