( नवी दिल्ली )
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO)च्या सुमारे 7 कोटी सदस्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी निश्चित करण्यात आलेले 8.25 टक्के व्याज लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF) खात्यांमध्ये जमा होणार आहे. केंद्र सरकारने या व्याजदराला मंजुरी दिल्यानंतर व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. माहितीनुसार, पुढील 15 दिवसांत देशभरातील कोट्यवधी सक्रिय EPF खात्यांमध्ये व्याजाची रक्कम जमा केली जाणार आहे. अनेक दिवसांपासून व्याजाच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचारी आणि खातेदारांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
8.25 टक्के व्याजदराला केंद्राची मंजुरी
आर्थिक वर्ष 2025-26 साठी EPFO ने 8.25 टक्के व्याजदर प्रस्तावित केला होता. या प्रस्तावाला वित्त मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर आता सर्व पात्र सदस्यांच्या PF खात्यांमध्ये व्याज जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
व्याज जमा झाल्यानंतर कसे तपासाल PF बॅलन्स?
व्याजाची रक्कम जमा झाल्यानंतर सदस्य खालील माध्यमांतून आपल्या खात्यातील अद्ययावत शिल्लक तपासू शकतात.
- EPFO Passbook Portal वर लॉगिन करून
- UMANG App द्वारे
- EPFO Member e-Sewa पोर्टलवर
- नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून SMS किंवा मिस्ड कॉल सुविधेद्वारे
व्याज जमा झाल्यानंतर पासबुकमध्ये वाढलेली रक्कम दिसू लागेल.
कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिलासा
EPFO च्या या निर्णयाचा फायदा देशातील लाखो नोकरदार आणि PF खातेधारकांना होणार आहे. खात्यात व्याज जमा झाल्याने कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती निधीत वाढ होणार असून, दीर्घकालीन बचतीलाही मोठा आधार मिळणार आहे.

