( पुणे )
ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ, निसर्गाशी एकरूप होऊन विजेवरील अवलंबित्व टाळत पर्यावरणपूरक जीवनशैली जगणाऱ्या डॉ. हेमा साने (वय ८५) यांचे आज, शुक्रवार (१९ सप्टेंबर) रोजी निधन झाले. त्या अविवाहित होत्या.
डॉ. साने यांचा जन्म १३ मार्च १९४० रोजी झाला. त्यांनी वनस्पतीशास्त्र विषयात एम.एस्सी. व पीएच.डी. केली होती. तसेच भारतविद्या शास्त्रात एम.ए. आणि एम.फिल. पदवी संपादन केली होती. पुण्यातील आबासाहेब गरवरे महाविद्यालयात त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले असून, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख म्हणून त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या.
निसर्गप्रेमी साने यांनी इतिहासाचा देखील अभ्यास केला होता. पुण्यातील जोगेश्वरी मंदिरासमोरील शीतलादेवी पार परिसरातील जुनाट वाड्यात त्या वास्तव्यास होत्या. त्यांच्या सहवासात चार मांजरे, एक मुंगूस, एक घुबड, तसेच भारद्वाज, साळुंकी, नाचण, दयाळ, वटवट्या असे पक्षीही राहत.
पर्यावरणपूरक जीवनशैलीची त्यांनी आयुष्यभर जोपासना केली. विजेचा वापर पूर्णपणे टाळल्यामुळे त्यांच्या घरात विद्युतदिवा, दूरदर्शन, रेफ्रिजरेटर, वॉटर हीटर, मायक्रोवेव्ह, मिक्सर यांसारखी कोणतीही आधुनिक उपकरणे नव्हती. नोकरीतील शेवटची दहा वर्षे त्यांनी लुना हे वाहन वापरले; अन्यथा त्या पायीच प्रवास करीत. पाणी त्या विहिरीवरून आणत आणि दूरध्वनीचा वापरही त्यांनी कधी केला नाही.
केवळ सूर्यप्रकाशात किंवा कंदिलाच्या उजेडात त्यांनी वनस्पतीशास्त्र, पर्यावरण, इतिहास व प्राच्यविद्या अशा विविध विषयांवर तीसहून अधिक पुस्तके लिहिली. अलीकडच्या काळात मात्र त्यांनी सौरऊर्जेवर चालणारा दिवा वापरू लागल्या होत्या.

