(मुंबई)
चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. बिश्नोई गँग ने सोशल मीडियावरून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, मुंबई पोलिसांना या प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.
मुंबई पोलिसांनी पुण्यातून एकूण पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. गुप्त माहिती आणि तांत्रिक निगराणीच्या आधारावर छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सिद्धार्थ दिपक येणपुरे, समर्थ शिवशंकर पोमाजी, स्वप्निल बंडू सकट, अमन आनंद मारोठे, आदित्य ज्ञानेश्वर गायके अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत. मात्र एका आरोपीची ओळख समोर आणलेली नाही. पुण्यातील वारजे, कर्वेनगर परिसरातून या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात आहे.
ऑडिओ संदेशात धमकी
सोशल मीडियावर ‘अर्जू बिश्नोई’ नावाच्या व्यक्तीचा ऑडिओ व्हायरल झाला आहे. यात शुभम लोणकर आणि हरी बॉक्सर यांचा उल्लेख असून, हल्ला त्यांच्या सांगण्यावरून झाल्याचा दावा केला आहे. ऑडिओमध्ये हा हल्ला केवळ ‘शॉर्ट ट्रेलर’ असल्याचे म्हटले असून, भविष्यातील मोठ्या संकटाची सूचना दिली आहे. बिश्नोई गँगने धमकी दिली की, जे लोक गँगच्या विरोधात जातील, त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. तसेच रोहित शेट्टींनी गँगच्या कामात हस्तक्षेप करू नये, अशी सूचना आधीही देण्यात आली होती.
पुढल्या वेळी छातीत गोळी घालू…
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी आणि गँगस्टर शुभम लोणकर याने रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याने रोहित शेट्टी आणि संपूर्ण बॉलीवूडला गंभीर परिणामांची धमकी दिली आहे. शुभम लोणकर, आरझू बिश्नोई, हरी बॉक्सर आणि हरमन संधू यांच्या नावाने ही पोस्ट करण्यात आली आहे. “रोहित शेट्टीच्या घरावर (शेट्टी टॉवर) जो गोळीबार झाला, त्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. हा फक्त ट्रेलर आहे. आम्ही त्याला अनेकदा निरोप धाडले होते की आमच्या कामात ढवळाढवळ करू नकोस, पण त्याला समजले नाही. हा फक्त एक छोटासा ट्रेलर आहे. जर तो सुधारला नाही, तर पुढची गोळी त्याच्या घराबाहेर नाही, तर त्याच्या बेडरूममध्ये थेट त्याच्या छातीवर घालू. आम्ही तुझी अवस्था बाबा सिद्दिकींपेक्षाही वाईट करू,” असा थेट इशारा गँगस्टरने दिला आहे.
या आरोपींना बिश्नोई गँग आणि मुंबईतील स्थानिक गुन्हेगारांशी दुवा म्हणून ओळखण्यात आले आहे. हल्ल्यानंतर आरोपी शहर सोडण्याच्या तयारीत होते, मात्र सीसीटीव्ही आणि मोबाइल लोकेशनच्या मदतीने त्यांना पकडण्यात आले. दरम्यान, रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, त्यांची वैयक्तिक सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

