(ठाणे / कल्याण )
कल्याण शहरातून बेपत्ता झालेल्या चार अल्पवयीन शाळकरी मुलींचा अवघ्या दोन दिवसांत शोध घेत पोलिसांनी त्यांना राजस्थानमधून सुखरूप ताब्यात घेतले आहे. कल्याणमधील एका उर्दू हायस्कूलमध्ये आठवी आणि नववीत शिकणाऱ्या या चार मुली तब्बल 904 किलोमीटर दूर राजस्थानातील मारवाड रेल्वे स्थानकावर आढळून आल्या. या घटनेमुळे पालकांसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.
शाळेत गेल्या… पण घरीच परतल्या नाहीत
29 जून रोजी या चारही मुली नेहमीप्रमाणे शाळेत गेल्या होत्या. मात्र, शाळा सुटल्यानंतरही बराच वेळ त्या घरी परतल्या नाहीत. बराच शोध घेऊनही त्यांचा पत्ता न लागल्याने पालकांनी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध
तक्रार मिळताच पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून चार स्वतंत्र तपास पथके तयार केली. रेल्वे स्थानक, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान या मुली राजस्थानकडे जाणाऱ्या रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने राजस्थानातील मारवाड रेल्वे स्थानकावर कारवाई करत चारही मुलींना सुखरूप ताब्यात घेतले.
घटनेची माहिती मिळताच कल्याणचे पोलिस उपायुक्त (DCP) अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) अशोक होनमाने यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. चारही अल्पवयीन मुलींचा सुरक्षित शोध लागावा आणि त्यांच्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सहा विशेष तपास पथके तैनात करण्यात आली.
अजमेरला दर्शनासाठी गेल्याची माहिती
प्राथमिक चौकशीत या मुली राजस्थानमधील अजमेर येथे दर्शनासाठी जात असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, चारही मुलींनी कोणालाही न सांगता तब्बल 904 किलोमीटर दूर अजमेरला जाण्याचा निर्णय का घेतला, त्यामागे नेमके कारण काय होते आणि या प्रवासात इतर कोणाचा सहभाग होता का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, चारही मुली कल्याण रेल्वे स्थानकातून मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी अजमेरकडे जाणारी अरावली एक्सप्रेस पकडल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले.
पुढील तपासात मुली अरावली एक्सप्रेसने राजस्थानच्या दिशेने प्रवास करत असून त्या मारवाड रेल्वे स्थानकावर पोहोचणार असल्याची खात्रीशीर माहिती कल्याण पोलिसांना मिळाली. त्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी वेळ न दवडता राजस्थान जीआरपी (Government Railway Police) आणि आरपीएफ (Railway Protection Force) यांच्याशी तातडीने समन्वय साधला. अरावली एक्सप्रेस मारवाड रेल्वे स्थानकावर पोहोचताच स्थानिक रेल्वे पोलिसांनी चारही मुलींना सुखरूप ताब्यात घेतले.
पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक
अवघ्या दोन दिवसांत आधुनिक तांत्रिक तपास, सीसीटीव्ही आणि रेल्वे पोलिसांच्या समन्वयातून चारही मुलींचा शोध घेऊन त्यांना सुखरूप कल्याणमध्ये परत आणण्यात पोलिसांना यश आले. या कामगिरीबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या मुलींची समुपदेशनासह सविस्तर चौकशी सुरू असून, या प्रकरणातील सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत.

