( वाशिम )
महाराष्ट्राला हादरवणाऱ्या रिसोड पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात तब्बल 15 वर्षांनंतर न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने 2011 मध्ये पोलिसांच्या कथित मारहाणीत मृत्यू झालेल्या बेग्या पवार प्रकरणात तत्कालीन पोलीस निरीक्षकासह 9 पोलिसांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निर्णयामुळे पोलीस कोठडीत होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणांबाबत कठोर संदेश गेल्याचे मानले जात आहे.
नेमके काय घडले होते?
9 मे 2011 रोजी रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील पारधी वस्तीवर धाड टाकली होती. त्यावेळी बेग्या पवार यांना चोरीच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले. आरोपानुसार, गुन्ह्याची कबुली मिळवण्यासाठी पोलिसांनी त्यांना कोठडीत अमानुष मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बेग्या पवार यांचा 10 मे 2011 रोजी पोलीस कोठडीत मृत्यू झाला.
शवविच्छेदनातून उघड झाले सत्य
बेग्या पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांविरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांचीच नावे प्रकरणात असल्याने तक्रार स्वीकारण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर या घटनेविरोधात आंदोलन आणि मोर्चे काढण्यात आले. शवविच्छेदन अहवालात बेग्या पवार यांच्या शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा आणि काही हाडे मोडल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला.
सीआयडी अधिकारी अन्वर शेख यांच्या पथकाने सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तपासात पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीमुळेच बेग्या पवार यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले.
या 9 पोलिसांना जन्मठेप
न्यायालयाने खालील आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
- तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे
- मदन केशव पवार
- शिवाजी नामदेव खिल्लारी
- पंजाब माणिकराव पाटकर
- रमेश सीताराम पवार
- प्रकाश हिरालाल तारम
- नागोराव भगवान खांडके
- अशोक निवृत्ती वैद्य
- वसंत कणिराम जाधव
या दोषींमध्ये दोन पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत.
दोषींना तुरुंगात रवाना
निकालानंतर सर्व दोषींना तातडीने वाशिम कारागृहात पाठवण्यात आले आहे. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना अमरावती मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात येणार आहे.
15 वर्षांनंतर कुटुंबाला न्याय
बेग्या पवार यांच्या मृत्यूवेळी त्यांचे लग्न होऊन अवघे एक वर्ष झाले होते. कुटुंबाच्या सातत्यपूर्ण लढ्यानंतर आणि सीआयडीच्या तपासामुळे अखेर 15 वर्षांनी न्यायालयाने दोषींना कठोर शिक्षा सुनावली. या निकालाकडे कोठडीतील मृत्यू आणि पोलीस अत्याचाराविरोधातील महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय म्हणून पाहिले जात आहे.

