(सातारा)
फलटण तालुक्यातील धोम-बलकवडी कालव्यात बुडून तीन परप्रांतीय कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. तिघेही मूळचे ओडिशा राज्यातील असून ते स्थानिक कंपनीत काम करत होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये ज्योतिर्मय भागीरथी नाईक (२२), सतीन बिरची नाईक (३५) आणि श्रीराम जगाई हेबरम (२०, सध्या रा. हिंगणगाव, मूळ रा. ओडिशा) यांचा समावेश आहे. हे तिघेही Premium Chickfeed Pvt. Ltd. या कंपनीत काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगणगाव ते आदर्की रस्त्याखालून जाणाऱ्या कालव्यातील पोटपाटाच्या सिमेंट पाईपमध्ये अडकल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी काम संपल्यानंतर हे तिघे कालव्यात पोहण्यासाठी उतरले होते. पोहत असताना कालव्यातील सिमेंट पाईपमध्ये एक जण अडकला. त्याला वाचविण्यासाठी गेलेले दोघेही त्याच पाईपमध्ये अडकल्याने तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्यात असलेल्या सिमेंट पाईपचा अंदाज न आल्याने तिघेही त्यात अडकले. पाईपमध्ये अडकून गुदमरल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने तिन्ही तरुणांचे मृतदेह सिमेंट पाईपमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या प्रकरणाची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सध्या उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकजण नदी, विहीर आणि कालव्यात पोहण्यासाठी उतरतात. मात्र पाण्याचा वेग, खोल भाग किंवा अशा पाईपसारख्या संरचना यांची माहिती नसल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असते. धोम-बलकवडी कालव्यातील ही दुर्घटना त्याचेच उदाहरण ठरली असून नागरिकांनी पाण्यात उतरताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

