(रत्नागिरी / वार्ताहर)
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७०चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. लेनी डा कोस्टा यांच्या आवाहनानुसार महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील सर्व रोटरी क्लबांनी १ जुलै रोजी एकाच दिवशी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. या उपक्रमाला प्रतिसाद देत रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीने वर्षभर राबविण्यात येणाऱ्या ‘कर्तव्याचा जागर फेस्ट २०२६-२७’ या सेवा अभियानाची सुरुवात भव्य रक्तदान शिबिराने केली.
जिल्हा शासकीय रुग्णालयात विविध रक्तगटांच्या रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला रत्नागिरीकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून गरजू रुग्णांसाठी जीवनदायी योगदान दिले. या उपक्रमामुळे आपत्कालीन परिस्थितीत आणि उपचाराधीन रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. शिबिराचे उद्घाटन अनबॉक्सचे गौरांग आगाशे आणि इव्हेंट चेअर रितेश सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष ॲड. मनीष नलावडे यांनी रक्तदाते, स्वयंसेवक, सहकार्य करणाऱ्या संस्था आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. क्लबचे सचिव आनंद चौगुले यांनी रक्तदानाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन केले.
या उपक्रमासाठी दैवज्ञ समाजाचे मोलाचे सहकार्य लाभले. दैवज्ञ भवनचे महेश खेडेकर यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिरासाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
‘कर्तव्याचा जागर फेस्ट २०२६-२७’ अंतर्गत आयोजित हे रक्तदान शिबिर रोटरी क्लबच्या सेवाभावी कार्याची प्रभावी सुरुवात ठरली. आगामी काळात आरोग्य, पर्यावरण संवर्धन, शिक्षण, कुपोषण निर्मूलन आणि समाजकल्याणाशी संबंधित विविध लोकहिताचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

