(रत्नागिरी / प्रतिनिधी)
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, सातत्य आणि क्रीडाप्रेमाच्या बळावर रत्नागिरीतील लक्ष्मीकांतवाडी, मिरजोळे येथील ॲड. सागर शिवाजी कळंबटे यांनी राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या यशामुळे आता राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धांमध्ये पंच म्हणून जबाबदारी सांभाळण्याची संधी त्यांना मिळणार असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कबड्डीच्या प्रवासाची सुरुवात कालिका कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून झाली. मंडळाच्या विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत असतानाच त्यांनी पंच म्हणून कारकीर्द घडविण्याचा निर्धार केला. २०१९ मध्ये जिल्हास्तरीय पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये निष्पक्ष आणि अभ्यासू पंच म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. यानंतर २०२२ मध्ये राज्य पंच परीक्षा उत्तीर्ण होत त्यांनी आपल्या गुणवत्तेची आणखी एक पायरी गाठली. सातत्यपूर्ण मेहनत, नियमांचा सखोल अभ्यास आणि मैदानावरील अनुभव यांच्या जोरावर यंदा २०२६ मध्ये राष्ट्रीय पंच परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होत त्यांनी रत्नागिरीसह संपूर्ण कोकणचा गौरव वाढविला.
गेल्या सात वर्षांत तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय असंख्य कबड्डी स्पर्धांमध्ये पंच म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. राज्य पंच म्हणून सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे झालेल्या चाचणी तसेच विविध कबड्डी स्पर्धांमध्ये त्यांच्या कामगिरीचे कौतुक झाले आहे. राष्ट्रीय पंच म्हणून निवड झाल्यानंतर बोलताना ॲड. सागर कळंबटे म्हणाले, “राष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे आणि निष्पक्षपणे पार पाडत कोकणचे नाव देशभर पोहोचविण्याचा प्रयत्न करेन. भविष्यात आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण होऊन जागतिक स्तरावरही कोकणचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे ध्येय आहे.”
राष्ट्रीय पंच म्हणून त्यांची झालेली निवड ही रत्नागिरीच्या क्रीडाक्षेत्रासाठी अभिमानास्पद घटना मानली जात असून, भविष्यात राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांमध्ये कोकणचा प्रतिनिधी म्हणून त्यांना पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, विविध संस्था तसेच नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

