(रत्नागिरी)
मूकबधिर विद्यार्थी शिक्षणाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात करून आत्मनिर्भरतेच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहेत. त्यांच्या प्रगतीकडे पाहून मी भारावून गेलो आहे. संस्था, शिक्षक आणि पालक यांच्या सातत्यपूर्ण पाठबळामुळे हे विद्यार्थी उल्लेखनीय यश संपादन करत आहेत. सामान्य माणूस अनेकदा काम न करण्यासाठी कारणे शोधतो; मात्र हे विद्यार्थी आपल्या कर्तृत्वातून समाजाला प्रेरणा देत आहेत, असे प्रतिपादन सायबर तज्ज्ञ डॉ. अक्षय फाटक यांनी केले.
दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कै. केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाच्या ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्ष सौ. दाक्षायणी बोपर्डीकर, संस्था सदस्य सीए मंदार जोशी, मुख्याध्यापक गजानन रजपूत, पालक प्रतिनिधी राधिका मुरकर यांच्यासह शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात सौ. बोपर्डीकर यांनी विद्यालयाच्या शिक्षकांचे विशेष कौतुक केले. अनेक शिक्षक निवृत्तीनंतरही शाळेशी नाते कायम ठेवून विविध स्वरूपात सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माजी विद्यार्थी आणि पालकांचेही त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात आविष्कार मतिमंद मुलांच्या शाळेतर्फे वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. माजी मुख्याध्यापक अरुण फाटक, शिक्षिका मंगल कोळंबेकर, रमेश घवाळी तसेच पालक आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक गजानन रजपूत यांनी विद्यालयाच्या गेल्या वर्षभरातील प्रगतीचा आढावा घेतला. इस्रो अभ्यासभेट, दहावीच्या विद्यार्थ्यांचे उपक्रम, विविध सण-उत्सव, ‘आनंदी दिवस’, शिबिरे, हस्तकला प्रदर्शन अशा अनेक उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
यंदा विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. तीर्था नागवेकर, साक्षी पेढे, मोहफिज पेटकर आणि मुईज बंदरी या चारही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणांसह यश मिळवल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
देणगीदारांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश आणि अन्य आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत वह्या, रंगपेट्या आणि विविध शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना भेट दिले.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांपैकी आत्मनिर्भर जीवन जगणाऱ्या आणि वैवाहिक आयुष्यात यशस्वी ठरलेल्या तीन मूकबधिर दांपत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतरही माजी विद्यार्थ्यांचे विद्यालयाशी असलेले घट्ट नाते आणि त्यांची समाजातील यशस्वी वाटचाल यावेळी अधोरेखित झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा मुळ्ये यांनी केले, तर राजकुमार कसबे यांनी आभार मानले.

