(रत्नागिरी)
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेदखल कुळांचा प्रश्न आजही गंभीर स्वरूपात कायम असून, हजारो कुळवहिवाटदार न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रश्नावर अनेक वर्षांपासून सातत्याने आवाज उठवणाऱ्या बहुजन विकास आघाडीने (बविआ) आता पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. लवकरच सर्व तहसीलदारांना निवेदने देण्यात येणार असून, प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बविआचे नेते सुरेश भायजे यांनी दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील बेदखल कुळांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रश्नासाठी बहुजन विकास आघाडीच्या वतीने तहसीलदार कार्यालये तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे, आंदोलने आणि विविध आंदोलनात्मक कार्यक्रम राबविण्यात आले होते. सुरेश भायजे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या लढ्यामुळे शासनाला दखल घ्यावी लागली आणि सन २००२ व २००६ मध्ये कुळकायद्यात महत्त्वपूर्ण दुरुस्त्या करण्यात आल्या.
या दुरुस्त्यांमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेदखल कुळांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात अधिकारी वर्गाकडून अद्यापही कुळांना न्याय मिळत नसल्याच्या तीव्र तक्रारी समोर येत आहेत. कायद्यातील तरतुदी असूनही अनेक कुळवहिवाटदारांना मोठा अन्याय सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन कायद्यातील कलम ४ (२) मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार, गावचा सरपंच, पोलीस पाटील किंवा विविध कार्यकारी संस्थेचा अध्यक्ष तसेच लगतचा कब्जेदार यांनी अर्जदाराच्या १२ वर्षांहून अधिक काळाच्या कुळवहिवाटीबाबत प्रतिज्ञापत्र दिल्यास संबंधित व्यक्तीला कुळ घोषित करण्याची तरतूद आहे. मात्र, या तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप कुळवहिवाटदारांकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर बविआचे नेते सुरेश भायजे, जिल्हाध्यक्ष तानाजी कुळ्ये, रत्नागिरी तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र धावडे, संगमेश्वर तालुकाध्यक्ष नारायण भुरवणे, लांजा तालुकाध्यक्ष दिलीप चौघुले तसेच बविआचे सल्लागार अॅड. संदीप ढवळ यांनी जिल्ह्याचा दौरा करून कुळांच्या समस्या जाणून घेतल्या.
दौर्यादरम्यान अनेक गंभीर बाबी समोर आल्या. जिल्ह्यातील हजारो कुळांच्या घराखालच्या जमिनी आजही त्यांच्या नावावर झालेल्या नाहीत. तसेच, प्रत्यक्ष वहिवाट आणि कुळवहिवाटीचे दावे करूनही अनेकांच्या जमिनींची नोंद त्यांच्या नावे करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले.
या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत बहुजन विकास आघाडीने आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार असून, प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सुरेश भायजे यांनी दिला आहे.

