(रत्नागिरी / वार्ताहर)
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डीएनई-१३६ चे रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री. देविदास इंगळे यांची विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) पदावर पदोन्नती झाली आहे. याबाबतचे आदेश रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदही रानडे यांनी नुकतेच पारित केले आहेत. श्री. इंगळे यांची गुहागर पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. देविदास इंगळे यांनी यापूर्वी राजापूर तालुक्यातील कुवेशी, दळे, जैतापूर, माडबन आणि जुवे-जैतापूर ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्य केले आहे. तसेच रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी, गावखडी, पूर्णगड, कासारवेली, काळबादेवी, नेवरे, कोतवडे आणि धामणसे येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली आहे.
प्रशासकीय सेवेसोबतच त्यांनी विविध कर्मचारी संघटनांमध्येही सक्रिय भूमिका निभावली आहे. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस, ग्रामसेवक युनियनचे जिल्हा सहसचिव, तालुका अध्यक्ष, कास्ट ट्राइब संघटनेचे तालुकाध्यक्ष तसेच RMBKS चे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे.
ग्रामविकास क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत सन १९९९ मध्ये त्यांना ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. दरम्यान, पदोन्नतीबद्दल श्री. इंगळे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कोतवडे ग्रामपंचायत येथे पंचायत समिती सदस्य श्री. स्वप्नील उर्फ तारक मयेकर यांच्या हस्ते त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच श्री. संतोष बारगोडे, माजी सरपंच श्री. तुफिल पटेल, माजी उपसरपंच श्री. स्वप्नील पड्याळ, ग्रामपंचायत सदस्य सौ. पायल पांचाळ, सौ. दिया कांबळे, श्रीमती ज्योती मयेकर, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
पदोन्नतीबद्दल श्री. इंगळे यांनी जिल्हा परिषद प्रशासन तसेच तालुका प्रशासनाचे आभार मानले आहेत.

