(विल्ये / अमित कांबळे)
रत्नागिरी तालुक्यातील वाटद जिल्हा परिषद गटाच्या नवनिर्वाचित सदस्या सौ. उषा राजेश सावंत यांचा गटातील विविध गावे, वाड्या आणि वस्त्यांमध्ये उत्स्फूर्तपणे सत्कार होत आहे. त्यांच्या विजयाबद्दल नागरिक, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
वाटद जि.प. गट हा औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या गटात विविध कंपन्या व उद्योग कार्यरत असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी सौ. सावंत यांनी आतापर्यंत सातत्याने काम केले आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी सैतवडे गुम्बद येथे ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच म्हणून प्रभावी कामगिरी बजावली. ९ फेब्रुवारी रोजी त्यांचा सरपंचपदाचा कार्यकाळ संपला. त्याआधी ७ फेब्रुवारी रोजी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवून सरपंचपदापासून थेट जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवड झाली.
या यशामागे शिवसेनेचे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक तसेच सर्व समाजबांधवांची मोलाची साथ लाभल्याचे त्यांनी सांगितले. मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच पती राजेश सावंत यांच्या पाठिंब्याबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली.
लोकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे सौ. सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
कळझोंडी गावचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आयु. संदीप पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते व वृत्तपत्रकार किशोर पवार यांनी सौ. उषा सावंत यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कळझोंडी धरणाच्या कामकाजाबाबतही चर्चा झाली.
कळझोंडी सुंदरवाडीच्या वतीने वाटद जि.प. सदस्या सौ. उषा सावंत, कळझोंडी पंचायत समितीच्या सदस्या सौ. अनुष्का खेडेकर तसेच माजी पंचायत समिती सदस्य व आगरनरळ गावचे माजी सरपंच अभय खेडेकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सुंदरवाडीचे प्रमुख यशवंत निंबरे, संजय शितप, चंद्रकांत वीर, विनायक दुर्गवळी, महिला मंडळाच्या सलोनी शितप, माजी सरपंच दिप्ती वीर, योगिता निंबरे, तेजल निंबरे, शामल शितप, धनश्री चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

