(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर पाणीटंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागल्या आहेत. नद्या, धरणे आणि जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने जिल्ह्यातील १३ पाणीटंचाईग्रस्त टँकर सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली आहे. मात्र, खेड, चिपळूण आणि संगमेश्वर या तीन तालुक्यांतील काही गावांमध्ये अद्यापही पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याचे चित्र आहे.
यंदाच्या जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. परिणामी, ७० गावे आणि १६२ वाड्यांतील तब्बल ४७ हजार ४८८ नागरिकांना १८ टँकरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत होता. वाढत्या उष्णतेमुळे जलस्रोत आटल्याने प्रशासनासमोरही मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र, जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात सलग झालेल्या पावसामुळे परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली. विशेषतः महिन्याच्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसाने धरणे, विहिरी आणि नदीपात्रांना नवसंजीवनी मिळाली. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील १० टँकर, तसेच मंडणगड, दापोली आणि गुहागर तालुक्यातील प्रत्येकी एक असे एकूण १३ टँकर बंद करण्यात आले.
पावसाची समाधानकारक नोंद होऊनही काही भागांतील स्थानिक जलस्रोत अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेले नसल्याने खेड, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागत आहे. त्यामुळे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरही काही गावांची टँकरवरील अवलंबित्व कायम असल्याचे वास्तव समोर आले आहे. सध्या संगमेश्वर तालुक्यात तीन, चिपळूण तालुक्यात एक आणि खेड तालुक्यात एक असे एकूण पाच टँकर कार्यरत असून, स्थानिक जलस्रोत पूर्णपणे पूर्ववत होईपर्यंत हा पुरवठा सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

