(रत्नागिरी)
मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज पालीचे विद्यार्थी सहभागी असलेल्या संघाने राज्यस्तरीय सब-ज्युनिअर थ्रो-बॉल मध्ये राज्य अजिंक्यपद प्राप्त केले आहे. त्यामुळे या खेळाडूंनी राज्य पातळीवर यशस्वी प्रतिनिधित्व केले आहे.
थ्रो-बॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संलग्नतेने व अधिपत्याखाली महाराष्ट्र थ्रो-बॉल असोसिएशन व नाशिक जिल्हा थ्रो-बॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक व २१ व २२ जानेवारी ला स्व.मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल औरंगाबाद नाका, पंचवटी, नाशिक येथे झालेल्या सब- ज्युनियर राज्यस्तरीय थ्रो-बॉल स्पर्धेत अव्वल ठरलेल्या संघामध्ये मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पाली मधील युवराज राम रसाळ,प्रथम सदानंद पवार, वेदांत प्रमोद शिंदे,सर्व आठवी अ हे खेळाडू सहभागी झाले होते.
उपांत्य फेरीत मुंबईचा आणि अंतिम फेरीत नाशिक संघाचा पराभव करून या संघाने राज्य अजिंक्यपद पटकावले आहे. महाराष्ट्रातील अनेक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेत पाली प्रशालेतील सहभागी झालेल्या तिन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट व चमकदार कामगिरी केली.
भोपाळ, मध्य प्रदेश येथे दिनांक ४ते ७ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी ( नॅशनल) महाराष्ट्राचा संघ रवाना होणार आहे. या स्पर्धसाठी प्रशाळेतील युवराज रसाळ, प्रथम पोवार व वेदांत शिंदे हे सहभागी होणार आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, मराठा मंदिर पाली हायस्कूलचे प्राचार्य सुदेश कांबळे, पर्यवेक्षिका नम्रता गोगटे, क्रिडा शिक्षक तुफील पटेल यांनी अभिनंदन केले आहे.