(मुंबई / वृत्तसंस्था)
अंधश्रद्धा, जादूटोणा आणि दुष्ट शक्तींची भीती दाखवून मुंबईतील एका सेवानिवृत्त वृद्ध दाम्पत्याला तब्बल ६.३८ कोटी रुपयांना लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार दहिसरमध्ये उघडकीस आला आहे. काळ्या जादूचा प्रभाव दूर करण्यासाठी अघोरी पूजा करण्याचे आमिष दाखवत आरोपींनी तब्बल १० वर्षे या दाम्पत्याची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या काळात दाम्पत्याकडील चार फ्लॅट्स, १२०० ग्रॅम सोने, कोट्यवधी रुपयांचे शेअर्स आणि मोठी आर्थिक बचत आरोपींनी हडप केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पारशी समाजातील दारा मेहता यांनी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी दहिसर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी उमेश देशपांडे याच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मेहता हे दहिसर पूर्व येथील गायत्री सोसायटीमध्ये राहतात. त्यांच्या तक्रारीनुसार, २०१६ मध्ये शेजारी राहणाऱ्या मेघना इनामदार हिच्यामार्फत त्यांची पनवेल येथील रमाबाई साने आणि तिचा साथीदार उमेश देशपांडे यांच्याशी ओळख झाली. त्या काळात दारा मेहता यांना तीन वेळा लकव्याचे झटके आले होते. त्यांच्या या परिस्थितीचा फायदा घेत घरात वास्तुदोष आणि जादूटोणा असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्याचा परिणाम दूर करण्यासाठी विशेष पूजा करावी लागेल, असे सांगून सुरुवातीला त्यांच्याकडून ४० ग्रॅम सोन्याची साखळी आणि ३.८५ लाख रुपये घेण्यात आले.
त्यानंतर आरोपींनी दाम्पत्याच्या मनात भीती निर्माण करून त्यांना सातत्याने विविध पूजा आणि धार्मिक विधी करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. घरातील मालमत्ता चेटकिणी आणि दुष्ट शक्तींच्या प्रभावाखाली असल्याचे सांगण्यात आले. हे दोष दूर करण्यासाठी पूजा केली नाही, तर पती आणि त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू होईल, अशी भीतीही त्यांना घालण्यात आली. या मानसिक दबावामुळे दाम्पत्याने आरोपी सांगतील त्याप्रमाणे आर्थिक व्यवहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर आरोपींच्या फसवणुकीच्या पद्धतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी या टोळीने अनेक बनावट पात्रे आणि काल्पनिक कहाण्या तयार केल्या होत्या. मुख्य आरोपी उमेश देशपांडे हा हैदराबादमधील एका मठातील १०८ वर्षीय गुरुवर्य असल्याचा भास निर्माण करून त्याच आवाजात लोकांशी संवाद साधत असे. अश्विनी गायकवाड, स्नेहलता दीक्षित ऊर्फ बाईसाहेब, वृषाली गायकवाड आणि रमाबाई साने या दाम्पत्याच्या संपर्कात राहून त्यांच्याशी संवाद साधत असत. त्यानंतर रमाबाईंची हत्या झाल्याची आणि कामशेत येथे बाईसाहेबांची समाधी असल्याची खोटी माहिती सांगून दाम्पत्याची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप आहे.
दाम्पत्याच्या घरी अघोरी पूजा करण्यात आली होती. या विधीदरम्यान घरात काळी बाहुली ठेवण्यात आली होती. तसेच एका नेपाळी साधूची राख आणि शेंदूर दाम्पत्याला खाण्यास दिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. काळ्या जादूचा प्रभाव दूर करण्यासाठी आणि मालमत्ता शुद्ध करण्यासाठी हे विधी आवश्यक असल्याचे आरोपींकडून सांगितले जात होते. या कथित पूजाविधींच्या नावाखाली दाम्पत्याच्या मालमत्तेवर आणि आर्थिक बचतीवर डल्ला मारण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मालमत्ता शुद्ध करण्याच्या नावाखाली आरोपींनी दहिसर आणि बोरिवली परिसरातील दाम्पत्याचे चार फ्लॅट विकण्यास सांगितले. या फ्लॅटच्या विक्रीतून अंदाजे ३.०२ कोटी रुपये मिळाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय पूजेसाठी पैसे उभे करण्याच्या नावाखाली दाम्पत्याला अंदाजे १.६० कोटी रुपयांचे शेअर्स विकावे लागले. बँका आणि पोस्ट ऑफिसमधील ४.५ कोटी रुपयांच्या ठेवीही मोडण्यात आल्या. एवढ्यावरच आरोपींचे समाधान झाले नाही. घरातील फर्निचरदेखील ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप आहे.
मठ बांधण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे सांगून आरोपींनी दाम्पत्याला एका सावकाराकडून ८ टक्के मासिक व्याजदराने ४५ लाख रुपयांचे कर्ज घेण्यास भाग पाडले. या कर्जाची परतफेड करण्यासाठी दाम्पत्याने अंदाजे ९० लाख रुपये खर्च केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारे अंधश्रद्धा आणि अघोरी पूजेच्या नावाखाली दाम्पत्याची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप आहे.
विशेष म्हणजे, ही टोळी यापूर्वीही अशाच प्रकारच्या आर्थिक फसवणुकीत सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील एका निवृत्त अधिकाऱ्याला शेअर बाजारात भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून या टोळीने यापूर्वी ५.१० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचेही समोर आले आहे. दहिसरमधील वृद्ध दाम्पत्याला तब्बल दशकभर अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून त्यांची आयुष्यभराची कमाई लुटल्याप्रकरणी पोलिसांनी उमेश देशपांडे याच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


