(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यात बेकायदेशीर मटका व्यवसायाविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, रत्नागिरी आणि गुहागर तालुक्यात टाकलेल्या स्वतंत्र छाप्यांमध्ये दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान मटका व्यवसायासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि रोख रक्कम असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील तिवराट-जाकादेवी मार्गावर बेकायदेशीर जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. या कारवाईत अमर सुरेश साळुंखे (वय ४२, रा. कोतवडे, ता. रत्नागिरी) हा मटका व्यवसाय चालवत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळावरून जुगारासाठी वापरण्यात येणारा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी येथेही पोलिसांनी मटका अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत नीलेश दिनकर जाधव (वय २८, रा. श्रृंगारतळी, ता. गुहागर) हा बेकायदेशीर मटका व्यवसाय चालवत असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी घटनास्थळावरून संबंधित साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली आहे.

