(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात 25 ऑक्टोबर रोजी बुडून बेपत्ता झालेले पर्यटक नितीन शंकर पवार हे अद्याप मिळून आलेले नाहीत. त्यामुळे ते गणपतीपुळे नजीकच्या कुठल्याही समुद्रकिनारी आढळून आल्यास तात्काळ जयगड सागरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील हमरापुर येथील नितीन शंकर पवार (वय वर्षे 35) हे आपल्या कुटुंबासहित श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे 25 ऑक्टोबर 2025 रोजी देवदर्शन व पर्यटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी आंघोळीसाठी समुद्रात उतरले असता ते समुद्राच्या खोल पाण्यात ओढले गेले. त्यानंतर ते दिनांक 25 ऑक्टोबरच्या बेपत्ता झालेल्या दिवसापासून पंधरा दिवस उलटून गेले तरी देखील अद्याप मिळून आलेले नाहीत. त्यांचा मोठ्या युद्ध पातळीवर शोध जयगड पोलिस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून गणपतीपुळे समुद्र किनारी व नजीकच्या समुद्रकिनाऱ्यावरील खडकाळ व डोंगराळ भागात सुरू आहे.
तसेच जयगड पोलीस ठाण्याकडून समुद्रात बोटीच्या सहाय्याने गस्त घालून नितीन पवार यांचा शोध घेण्यात आला आहे. मात्र तरी देखील त्यांच्या शोधाचे चक्र जयगड पोलिसांसमोर कायम राहिले आहे. नितीन पवार हे बेपत्ता झालेल्या दिवसापासून अद्याप स्थानिक जीवरक्षक, व्यावसायिक, ग्रामसुरक्षा रक्षक दलाचे सदस्य, पोलीस पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांना आढळून आलेले नाहीत.त्यांचा गणपतीपुळे बरोबरच नजीकच्या मालगुंड, भंडारपुळे, वरवडे, नेवरे , काजीरभाटी आदी समुद्रकिनारी जयगड पोलीस ठाण्याकडून कसून शोध सुरू आहे. तसेच त्यांच्या शोधासाठी त्यांची कुटुंबीय व नातलग मंडळी देखील अधूनमधून गणपतीपुळे दाखल होत असतात. त्यांच्यासमवेत जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने अतिशय जबाबदारीने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु अद्याप पोलिसांना यश आले नसून गणपतीपुळेबरोबरच नजीकच्या समुद्रकिनारी असलेल्या नागरिकांना बेपत्ता नितीन पवार यांची माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ जयगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
बेपत्ता नितीन पवार यांच्या कुटुंबीयांकडून सोशल मीडियावर देखील “हरवला आहे “अशा स्वरूपाची पोस्ट त्यांचा फोटो आणि माहिती देऊन व्हायरल केली असून संबंधित कुटुंबीयांकडून त्यांच्या शोधासाठी आवाहन करण्यात आले आहे. एकूणच अद्याप बेपत्ता असलेले नितीन पवार हे मिळून येत नसल्याने त्यांचे कुटुंबीय पूर्णतः दुःखाच्या सावटाखाली आणि चिंतेत आहेत. याबाबत संपूर्ण गणपतीपुळे परिसरात आणि बेपत्ता पर्यटक नितीन शंकर पवार यांच्या कुटुंबीयांबद्दल मोठी संवेदना व्यक्त केली जात असून नितीन पवार यांच्या शोधासाठी येणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना माणुसकीच्या भावनेतून सहकार्य करण्यासाठी स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थ देखील मेहनत घेत आहेत.

