(रत्नागिरी / वार्ताहर)
कृषी दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, वायंगणी येथे उद्यानविद्या महाविद्यालय, दापोलीच्या RHWE विद्यार्थ्यांच्या वतीने “निसर्ग जपूया, शेती समृद्ध करूया” या संकल्पनेवर आधारित शेतकरी जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातून वृक्षसंवर्धन, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती आणि ‘लाखी बाग’ संकल्पनेविषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला गोळप ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदीप तोडणकर, वायंगणीचे पोलिस पाटील नितीन खाडे, कृषी सहाय्यक दीपाली साळुंके, मुख्याध्यापिका दिपीका माळी, ग्रामपंचायत सदस्य शेडगे व राडिये, तसेच शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य आणि RHWE विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने झाली. पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि शाश्वत शेतीविषयी घोषणा देत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यानंतर श्री वायंगणेश्वर मंदिर परिसरात वृक्षलागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कृषी दिनाचे महत्त्व, देशाच्या विकासातील शेतकऱ्यांचे योगदान आणि हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यानंतर गो-कृपा अमृतम् तयार करण्याची पद्धत, त्यातील घटक, उपयोग आणि पिकांवरील सकारात्मक परिणाम याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच BAIF संस्थेच्या कु. प्राजक्ता हटीटे यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित करत शेतकऱ्यांना शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी विकसित केलेल्या ‘लाखी बाग’ संकल्पनेची माहिती देण्यात आली. नारळ बागांमध्ये जायफळ, काळी मिरी आणि दालचिनी यांसारख्या मसाला पिकांची आंतरपीक पद्धती अवलंबून उत्पादन व उत्पन्न कसे वाढवता येते, याचे मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच जपानी शेतकरी मसानोबू फुकुओका यांनी विकसित केलेल्या ‘बीजगोळा (Seed Ball)’ संकल्पनेची माहिती देत वृक्षसंवर्धन, जंगलांचे पुनरुज्जीवन आणि पर्यावरण संरक्षणामध्ये या तंत्राचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकऱ्यांना गो-कृपा अमृतम् चे कल्चर वितरित करण्यात आले. शेतकऱ्यांनी RHWE विद्यार्थ्यांशी विविध कृषी विषयांवर संवाद साधत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
या उपक्रमात साहिल भोसले, श्रीरंग भडेकर, योगेश गायकवाड, कौस्तुभ इंदप, अथर्व कांबळे, ओंकार हाके आणि प्रणय भटकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या उपयुक्त, लोकाभिमुख आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

