(नवी मुंबई / वृत्तसंस्था)
नवी मुंबईत आयफोनच्या कर्जाच्या हप्त्यांवरून झालेल्या वादातून एका तरुणाची त्याच्याच मित्राने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रतीक अंबवले असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी कोपरी पोलिसांनी प्रतीक जाधव याला अटक केली आहे. दोघांमधील आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर अखेर हत्येत झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
प्रतीक अंबवले हा ७ नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी त्याचा विविध ठिकाणी शोध घेतला; मात्र तो सापडला नाही. त्यामुळे त्यांनी कोपरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केल्यानंतर बेपत्ता होण्यापूर्वी प्रतीक हा त्याचा मित्र प्रतीक जाधव याच्यासोबत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी जाधवला ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आयफोन खरेदी करण्यासाठी प्रतीक अंबवले याने मित्र प्रतीक जाधवच्या नावावर कर्ज घेतले होते. सुरुवातीचे काही हप्ते भरल्यानंतर अंबवलेने ईएमआय भरणे बंद केले. त्यामुळे कर्ज देणाऱ्या कंपनीकडून जाधवला वारंवार फोन येत होते. सततच्या तगाद्यामुळे तो त्रस्त झाला होता. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
हप्त्यांच्या बाकीबाबत चर्चा करण्यासाठी ७ नोव्हेंबर रोजी दोघे पनवेल रेल्वे स्थानकावर भेटले. तेथून ते पनवेलजवळील शिवकर गावात गेले. गावातील एका शाळेच्या पाठीमागे ते दारू पिण्यासाठी बसले असताना पुन्हा आयफोनच्या ईएमआयचा विषय निघाला. त्यावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर संतापलेल्या प्रतीक जाधवने धारदार चाकूने अंबवलेवर वार केले. या हल्ल्यात अंबवलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
कोपरी पोलिसांनी तपास करून या हत्येचा उलगडा केला. मात्र, हत्या झाल्याचे ठिकाण पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तेथे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रतीक जाधवला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेची माहिती मिळताच पनवेल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, हत्येमागील कारण आणि वादासंदर्भातील अधिक माहिती पोलीस गोळा करत आहेत.


