(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत दिवस-रात्र कार्यरत असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात बुधवारी (1 जुलै ) एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. रुग्णालयातील व्यस्त कामकाज आणि शस्त्रक्रियांच्या धावपळीतही ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल होणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांचे इंटर्न डॉक्टरांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत करत त्यांना डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल होताच विशेष स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांचे इंटर्न विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छाऐवजी प्रतीकात्मक गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या अनपेक्षित सन्मानामुळे क्षणभर ऑपरेशन थिएटरमध्येही आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर भूलतज्ज्ञ डॉ. जामेशीर तसेच जनरल सर्जन डॉ. मनोहर कदम यांचेही विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले. सतत रुग्णसेवेत व्यग्र असलेल्या डॉक्टरांच्या चेहऱ्यावर या छोट्याशा सन्मानामुळे समाधानाचे हास्य उमटले.
राष्ट्रीय डॉक्टर दिन हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याची भावना यावेळी इंटर्न डॉक्टरांनी व्यक्त केली. शस्त्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यात रुग्णाची जीवनावश्यक चिन्हे सुरक्षित ठेवण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी भूलतज्ज्ञ डॉ. जामशेर समर्थपणे पार पाडतात. शस्त्रक्रिया सुरू होण्यापासून ती पूर्ण होईपर्यंत रुग्णाच्या प्रत्येक श्वासावर आणि प्रकृतीतील प्रत्येक बदलावर त्यांची बारकाईने नजर असते. शांत स्वभाव, अचूक निर्णयक्षमता आणि रुग्णसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची त्यांची कार्यपद्धती वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया कौशल्याने आणि आत्मविश्वासाने पार पाडणारे जनरल सर्जन डॉ. मनोहर कदम हे रुग्णसेवेतील समर्पणाचे उत्तम उदाहरण मानले जातात. प्रत्येक रुग्णाकडे संवेदनशीलतेने पाहत अचूक उपचार आणि शस्त्रक्रियेद्वारे नवजीवन देण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत. त्यांची कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि वैद्यकीय ज्ञान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत असून, सेवाभावातूनच डॉक्टरकीचे खरे मूल्य अधोरेखित होते, याची जाणीव त्यांच्या कार्यातून होते.
विशेष स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर हे वैद्यकीय सेवा, प्रशासकीय नेतृत्व आणि विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन यांचा उत्कृष्ट समतोल साधणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत ते अत्यंत संवेदनशीलतेने आणि समर्पित भावनेने कार्य करतात. व्यस्त कामकाजाच्या वेळापत्रकातही रुग्णांशी साधलेला संवाद, कनिष्ठ डॉक्टरांना दिलेले मार्गदर्शन आणि वैद्यकीय क्षेत्रातील शिस्तबद्ध कार्यपद्धती यामुळे ते इंटर्न डॉक्टरांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. सेवाभाव, नेतृत्वगुण आणि मानवतेची जपणूक हीच डॉक्टरकीची खरी ओळख असल्याचा संदेश त्यांच्या कार्यातून सातत्याने अधोरेखित होताना दिसत असतो.
डॉक्टर आणि विद्यार्थी यांच्यातील गुरु-शिष्य नात्याला अधिक दृढ करणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला. अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, रुग्णांप्रती असलेली बांधिलकी आणि मानवतेची जपणूक या मूल्यांना सलाम करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने रुग्णालय परिसरात कृतज्ञता, सन्मान आणि सेवाभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले. वैद्यकीय व्यवसायातील निष्ठा, समर्पण आणि मानवी मूल्यांना उजाळा देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला आहे.

