(सूरत / वृत्तसंस्था)
कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेला यशस्वी कापड व्यवसाय, तीन दुकाने आणि सुख-सुविधांनी परिपूर्ण आयुष्य मागे सोडून सूरतमधील एका व्यावसायिक कुटुंबाने अध्यात्माचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे १५ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेले कापड व्यावसायिक दिलीपभाई भोगार हे पत्नी ज्योतीबेन आणि दोन मुली छवी व चार्वी यांच्यासह ८ फेब्रुवारी २०२७ रोजी जैन दीक्षा घेणार आहेत. सूरतच्या पाल परिसरात हा दीक्षा सोहळा होणार आहे. यावेळी उदयपूर जिल्ह्यातील दिलीप भाई भोगर (४७), त्यांची पत्नी ज्योती बेन (४५) आणि दोन मुली छवी (२२) व चार्वी (१४) हे चौघे जैन दीक्षा घेणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या दुसऱ्या मुलीने शैली हिने २०२३ मध्येच दीक्षा घेतली असून ती सध्या ‘साध्वी दर्शिता’ या नावाने ओळखली जाते. त्यामुळे आता भोगर कुटुंबातील आणखी चार सदस्य सांसारिक जीवनाचा त्याग करून संयम आणि तपश्चर्येच्या मार्गावर वाटचाल करणार आहेत.
राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातील जसवंतगड हे दिलीपभाई भोगार यांचे मूळ गाव आहे. सुरतमध्ये आल्यानंतर त्यांनी एका छोट्या दुकानातून कापड व्यवसायाला सुरुवात केली. मेहनत, अनुभव आणि व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. आज सूरतच्या कापड बाजारपेठेत त्यांची तीन दुकाने आहेत. याशिवाय यंत्रसामग्रीमध्येही त्यांनी गुंतवणूक केली. या प्रयत्नांतून त्यांनी सुमारे १५ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेला व्यवसाय उभा केला.
व्यवसायात यश मिळत असताना त्यांच्या मनात मात्र धर्म आणि अध्यात्माविषयीची ओढ वाढत गेली. एका आचार्यश्रींच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या विचारांमध्ये बदल झाला. सांसारिक सुख-सुविधांबद्दलचा मोह कमी होत गेला आणि वैराग्याची भावना निर्माण झाली. त्यामुळे व्यवसायाचा आणखी विस्तार करण्याऐवजी त्यांनी तो हळूहळू कमी करण्यास सुरुवात केली. अनेक वर्षांच्या परिश्रमातून उभारलेला व्यवसाय सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
दिलीपभाईंच्या या निर्णयाला पत्नी ज्योतीबेन यांनीही पूर्ण पाठिंबा दिला. त्यानंतर संपूर्ण कुटुंबात अध्यात्म आणि संयमाचा मार्ग स्वीकारण्याबाबत चर्चा झाली. दोन्ही मुलींनीही पालकांच्या निर्णयाला सहमती दर्शवत स्वतः दीक्षा घेण्याची इच्छा व्यक्त केली. कुटुंबातील एका मुलीने यापूर्वीच संन्यासमार्ग स्वीकारला असल्याने भोगर परिवारात दीक्षेची परंपरा यापूर्वीही सुरू झाली आहे. शैली हिने २०२३ मध्ये दीक्षा घेतल्यानंतर ‘साध्वी दर्शिता’ हे नाव धारण केले.
आता २२ वर्षीय छवी आणि १४ वर्षीय चार्वी या दोघीही दीक्षा घेणार आहेत. छवीने बीबीए (BBA) पदवी पूर्ण केली असून ग्राफिक डिझाइनचेही शिक्षण घेतले आहे. क्रोशियामध्ये शिक्षण घेणारी छवी आता सांसारिक जीवनाचा त्याग करण्यासाठी सज्ज झाली आहे.
कुटुंबातील सर्वांत धाकटी असलेल्या चार्वीने आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. नववीत असतानाच तिच्या मनात अध्यात्माची ओढ निर्माण झाली आणि तिने दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, चार्वीला फुटबॉलची आवड असून तिने सूरतमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धांमध्येही सहभाग घेतला आहे.
जैन दीक्षा स्वीकारण्यापूर्वी या चौघांनी जैन साधू-साध्वींसोबत राहून त्यांच्या जीवनशैलीचा अनुभव घेतला. पायी प्रवास करणे, आहार-विहाराचे नियम पाळणे आणि दैनंदिन धार्मिक आचारांचे पालन करणे याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. दीक्षेनंतरचे कठोर जीवन अंगीकारण्यासाठी त्यांनी स्वतःला तयार केले आहे. सध्या हे कुटुंब आपल्या मूळ गावी आले असून, त्यांच्या निर्णयामुळे गावात भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारे १५ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेला व्यवसाय, व्यावसायिक प्रतिष्ठा आणि ऐहिक सुखांचा त्याग करून दिलीपभाई, ज्योतीबेन, छवी आणि चार्वी हे चार सदस्य ८ फेब्रुवारी २०२७ रोजी संयममार्ग स्वीकारणार आहेत.


