(चिपळूण/ रत्नागिरी प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या गॅबियन वॉलच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंतीच्या पायाभागाखालची माती वाहून गेल्याने तिचा पाया कमकुवत झाला असून, काही ठिकाणी भिंतीला तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, ही संरक्षक भिंत कोसळण्याची भीती व्यक्त केली जात असून, घाटाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान परशुराम घाटात मोठ्या प्रमाणावर डोंगर उत्खनन करण्यात आले होते. काही ठिकाणी भराव टाकून रस्त्याची उंची वाढविण्यात आली. या पार्श्वभूमीवर घाटातील उतार स्थिर राहावेत, दरडी कोसळण्याचा धोका कमी व्हावा आणि महामार्गासह परिसराचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने गॅबियन वॉल उभारण्यात आली होती. परशुराम घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पेढे-परशुराम परिसरात पावसाळ्यात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. अनेकदा या दरडी गावाच्या दिशेने सरकत झाडे, शेती आणि परिसराचे नुकसान करतात. त्यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेबरोबरच राष्ट्रीय महामार्गाचे संरक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेली गॅबियन वॉल अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
मात्र, यंदाच्या पावसातच गॅबियन वॉलच्या फाउंडेशनखालची माती वाहून गेल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे भिंतीची स्थिरता धोक्यात आली असून, काही भागांत तडे पडल्याने बांधकामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या संरक्षण व्यवस्थेची पहिल्याच पावसात झालेली ही अवस्था गुणवत्तेच्या निकषांवर गंभीर प्रश्न निर्माण करणारी असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून गॅबियन वॉलची संरचनात्मक तपासणी करावी, आवश्यक दुरुस्ती तात्काळ हाती घ्यावी आणि भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
काँक्रिटीकरणालाही उभे तडे
परशुराम घाटातील काँक्रिटीकरणालाही अनेक ठिकाणी उभे तडे गेल्याचे दिसून येत आहे. हे तडे दिवसेंदिवस अधिक रुंदावत असल्याने घाटाच्या सुरक्षिततेबाबतची चिंता वाढली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत असून, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडूनही आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तयारी सुरू असल्याचे समजते.

