(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रेल्वे कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावर घेतलेला जनरेटर परत न करता व भाडे न भरल्याने दोन सिव्हिल कंत्राटदारांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जय कदम व कुणाल जय कदम (दोघेही रा. भातगाव, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यांच्यावर भा.दं.वि. कलम ४२० व ४०६ अंतर्गत कारवाई झाली आहे.
फिर्यादी श्रीनिवासराव गोपालकृष्णय्या गोगीनेनी (वय ५७, रा. ओमविहार संकुल, मिरजोळे, रत्नागिरी) हे ‘आदित्य कन्स्ट्रक्शन’ (इंजिनिअर अँड कॉन्ट्रॅक्टर) या कंपनीचे मालक असून, एल अँड टी कंपनीकडून रेल्वेची विविध कामे घेतात. आरोपी जय कदम हा सिव्हिल कंत्राटदार असल्याने त्यांच्याशी त्यांचा व्यावसायिक परिचय होता.
दि. ११ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता, टिके (ता. रत्नागिरी) येथे एल अँड टी कंपनीच्या मालकीचा आणि फिर्यादी यांच्या ताब्यात असलेला दोन लाखांचा होडा कंपनीचा ७.५ केव्ही क्षमतेचा लाल रंगाचा जनरेटर जय कदम व कुणाल जय कदम यांना काही दिवस वापरण्यासाठी विश्वासाने भाडेतत्त्वावर देण्यात आला होता. मात्र, आरोपींनी जनरेटर स्वतःच्या फायद्यासाठी वापरून, तो फिर्यादीकडे परत न करता, संबंधित भाडे (१५,००० रुपये प्रतिमहिना प्रमाणे) तब्बल ४० महिन्यांचे ६ लाख रुपयेही दिले नाहीत.
त्यामुळे एकूण ८ लाख रुपयांचा विश्वासघात व आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७९/२०२५ अन्वये कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.