(कोल्हापूर / वृत्तसंस्था)
हातकणंगले येथील नर्मदे मळा परिसरात कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्गावर मृतावस्थेत आढळलेल्या तृप्ती सुजित गवळी यांच्या मृत्यूप्रकरणी पती सुजित कृष्णात गवळी (वय ३१) याच्याविरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारंवार पैशांची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ करणे, तसेच तृप्ती यांच्या आई आणि भावाला जीवे मारण्याची धमकी देणे, असे आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत. या छळाला कंटाळून तृप्ती यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
तृप्ती यांचा मृतदेह १५ नोव्हेंबर रोजी सकाळी सातपूर्वी हातकणंगले येथील तारदाळ रस्त्यालगत असलेल्या हॉटेलसमोर रेल्वे पोल क्रमांक २३/९ ते २४/०० दरम्यान आढळला होता. यापूर्वी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. घटनास्थळी मिळालेल्या मोबाईलच्या आधारे मृत महिलेची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही आढळली असून, त्या आधारे आत्महत्येमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
तृप्ती आणि सुजित यांचा विवाह १ जानेवारी २०२० रोजी झाला होता. दोघांनी आंतरजातीय विवाह केला होता. या विवाहाला तृप्ती यांच्या माहेरच्या मंडळींचा विरोध असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांचे माहेर अंबरनाथ (ठाणे) येथे असून, वडिलांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे. तृप्ती या पतीसोबत करवीर तालुक्यातील कणेरी येथे राहत होत्या. कामानिमित्त गवळी कुटुंबीय काही काळ कोल्हापुरातील राजाराम चौक, टिंबर मार्केट परिसरात भाड्यानेही राहिले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजित हा बंगळुरू येथे काम करत असल्याचे सांगतो. तृप्ती काही दिवसांपूर्वी पुण्यातील आत्याकडे गेल्या होत्या. शनिवारी रात्री त्यांनी कोल्हापूरला परत येत असल्याची माहिती पतीला दिली होती. त्यामुळे सुजित रविवारी पहाटेपर्यंत रेल्वे स्थानकावर त्यांची वाट पाहत होता. मात्र, तृप्ती यांचा मोबाईल बंद असल्याने त्याची चिंता वाढली होती. प्राथमिक तपासानुसार, तृप्ती हातकणंगले परिसरात उतरून नर्मदे मळ्याच्या दिशेने गेल्या असाव्यात.
दरम्यान, नर्मदे मळ्याजवळ रेल्वे रुळांवर महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती रुग्णवाहिका सेवेशी संबंधित स्वप्नील नरुटे यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून पोलिसांना याबाबत कळवले. त्यानंतर पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर नातेवाईकांशी संपर्क साधून तो ताब्यात घेण्यासाठी येण्याची सूचना करण्यात आली. मात्र, मुलीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे सांगितल्यानंतरही नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी येण्यास नकार दिला. मृतदेहाची विल्हेवाट तुम्हीच लावा, आम्ही येणार नाही, असा निरोप त्यांनी पोलिसांना दिल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
दरम्यान, लग्नानंतर आर्थिक कारणांवरून पती-पत्नीमध्ये वाद होत होते का, तसेच अन्य कोणत्या कारणामुळे तृप्ती यांनी आत्महत्या केली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीतील मजकुरातून मृत्यूमागील कारणांचा उलगडा होण्याची अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे. पतीकडून झालेल्या कथित शारीरिक आणि मानसिक छळामुळेच त्यांनी आत्महत्या केली का, याचीही चौकशी सुरू आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती हातकणंगलेचे पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिली. विवाहितेच्या पतीचा जबाब नोंदवण्यात आला असून, त्याच्यासह अन्य संशयितांची मंगळवारी चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीतून आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होईल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक पिलाणे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.


